Weather update : मान्सूनच्या (monsoon) पावसाने (rain) दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) देशातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. I
IMD नुसार, शुक्रवारी उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात असलेल्या उष्णतेच्या लाटेच्या स्थितीपासून थोडासा दिलासा मिळाला आणि पुढील आठवड्यात कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची अपेक्षा आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मृगनक्षत्राचा मुहूर्त चुकवल्यानंतर मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनने सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात सर्वत्र दमदार हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणारा बळीराजा त्यामुळे सुखावला आहे. आता खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे.
पुढील दोन ते तीन दिवस लखलखाट तसेच गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र काल झालेल्या पहिल्या मान्सूनच्या दमदार हजेरीमुळे तळवडेत दुकानात पाणी शिरले. मान्सून जिल्ह्यात दाखल झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे.
मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात आणि घाटमाथ्यावर ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप सुरू आहे.
उद्यापासून या शहरांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावू शकतो. मुंबईसह, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे जळगाव, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे.
१५ जूनपर्यंत उष्णतेपासून दिलासा मिळणार नाही
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आरके जेनामानी (RK Jenamani) यांच्या मते, ‘उष्णतेच्या लाटेची तीव्रता एप्रिलच्या अखेरीस आणि मे महिन्याच्या तुलनेत किंचित कमी असते, परंतु प्रभाव क्षेत्र जवळपास समान असते.
त्याच वेळी, IMD च्या मते, ओलावा-समृद्ध पूर्वेकडील वाऱ्यांमुळे १६ जूनपासून तीव्र उष्णतेपासून बराच दिलासा मिळेल. पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये १२ जूनपासून मान्सूनपूर्व हालचालींचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशमध्ये सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान राहील. दिल्ली-एनसीआरसह वायव्य भारतातील काही भागांमध्ये 11-12 जून रोजी थोडासा दिलासा मिळू शकतो आणि आठवड्याच्या शेवटी ढगाळ वातावरण असेल परंतु पावसाची शक्यता नाही. तर १५ जूनपर्यंत मान्सून दिल्लीत दाखल होऊ शकतो.