अहमदनगर – राहाता आठवडे बाजार तब्बल दोन वर्षांनंतर पूर्ववत सुरू झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा बाजार बंद होता. मात्र आता हा बाजार सुरु झाल्याने फळे, भाजी विक्रेते व व्यापार्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. करोनाचे सावट कायमचे दूर व्हावे व आठवडे बाजार नेहमीच सुरू राहावा यासाठी व्यावसायिक देवाला साकडे घालत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देशात करोना या आजारामुळे लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी सरकारने अनेक कठोर निर्बंध लागू केले होते.
यातच त्यात मुख्य गर्दी होणारा आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय घेतल्याने हातावर पोट असणार्या लाखो व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती.
आठवडे बाजार बंद असल्यामुळे शेतकर्यांना शेतीमालाची विक्री करण्यासाठी योग्य जागा नसल्याने शेतीमालाला भाव मिळाला नाही. करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून आठवडे बाजार बंद असल्यामुळे अनेकांची आर्थिक गणिते बिघडली होती.
अखेर करोना संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारने आठवडे बाजार सुरू करण्यासाठी परवानगी दिली असल्याने 11 नोव्हेंबर रोजी राहाता येथे तब्बल दोन वर्षानंतर आठवडे बाजार सुरू झाला त्यामुळे शेतकरी, भाजी, फळे विक्रेते व इतर छोटे-मोठे व्यावसायिकांच्या चेहर्यावर आनंद दिसू लागला आहे.