file photo

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेले आठवडे बाजार अद्याप ही बंद ठेवण्यात असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भाजी व शेत मालाची विक्री करणे मुश्किल झाले आहे.

पर्यायाने बेरोजगारीमुळे अनेकांची उपासमार होत आहे. आठवडे बाजार हा शेतकरी, व्यापारी यांचा आर्थिक कणा असून, शेतकरी, छोटे व्यापारी आठवडे बाजारात आपला माल विक्रीसाठी आणतात . गरजू लोक बाजरच्या दिवशी मोलमजूरी करून आपली उपजीवीका भागवतात.

कोरोना विषाणू महामारीच्या अनुषंगाने सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून व कोरोना संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी, कोरोनाची चैन ब्रेक करण्यासाठी सर्वच ठिकाणचे आठवडे बाजार बंद करण्यात आले. त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.

शेतातील उत्पादित भाजीपाला विक्रीअभावी जनावरांना चारावा लागत आहे. बेरोजगारांच्या हाताला काम देणारे, शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी सोईचे ठरणारे आठवडे बाजार ऐन सणासुदीच्या तोंडावर बंद आहेत. ते तात्काळ सुरु करणे आवश्यक आहे .

शासनाने मॉल , जीम, हॉटेल, एसटी बस, बँका , दारुची दुकाने व इतर सर्व प्रकारची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे तर मग आठवडे बाजार भरवण्यास निर्बंध का ?

असा सवाल शेतकरी, व्यापारी व विक्रेत्यां मधून उपस्थित केला जात आहे. आठवडे बाजार सर्वसामान्यांचा शॉपिंग मॉल आहे. ग्रामीण भागाचे अर्थकारण बऱ्याच अंशी आठवडे बाजारावर अवलंबून असते.

शहरातील दुकानात काम करणारे शेकडो बेरोजगार तरुण आठवडे बाजारात भाजीपाला, कपडे, शेती औजारे व इतर वस्तुंची विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात ,

परंतु आठवडे बाजारच बंद असल्याने या सर्व तरुणांचा रोजगार हिरावला गेला असल्याने ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मोडला असल्याचे दिसत आहे.