ताज्या बातम्या

नव्या वर्षाचे स्वागत यावर्षी घरच्या घरी! कारण कोरोना अजून संपला नाही

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- 2022 या नववर्षाचे स्वागत आणि 2021 या वर्षाला निरोप देण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात. 31 डिसेंबर रोजी त्याचे आगळे वेगळे सेलिब्रेशनदेखील ठरलेले असेल, असो. या आनंद सोहळयात नववर्षाचे स्वागत आप्तस्वकियांबरोबरच करा. हा आनंद आपल्या आठवणीच्या गोड कुपीत जपून ठेवताना काही अनर्थ होणार नाही याची काळजी घ्या.

अगदी असेही म्हणेन की, हॅपी न्यू ईअर साजरा करा पण घरच्या घरी.. कारण कोरोना अजून संपलेला नाही.. नववर्षाचे स्वागत आपण सर्व मोठ्या उत्साहात करत असतो. खूप आनंदी वातावरण असते. नववर्षाच्या स्वागताचा आनंद घेताना या आनंदाचा बेरंग होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.

पोलीस, आर.टी.ओ. विभागाकडून वाहन चालविण्याबद्दल असलेल्या महत्वाच्या ‘डोन्ट ड्रिंक ऍन्ड ड्राईव्ह’ या सूचनेकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. आपला जीव जसा अनमोल आहे तसाच तो इतरांचाही आहे. आपण सर्वजण समजदार आहोतच पण कधी कधी अतिरेक होतो आणि मग…. असो या बद्दल जास्त चर्चा नको.

यावेळी मात्र नववर्षाचा आनंद हा घरच्या-घरीच घ्यावयाचा आहे. आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी गृह विभागाने 31 डिसेंबर 2021 व नूतन वर्ष 2022 चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याबाबत नुकत्याच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या अनुषंगाने नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता शक्यतो घरीच साधेपणाने साजरे करावे.

रात्री 9.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे, याकडे लक्ष द्यावे. याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या 50% पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या 25% च्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी असणार आहे.

या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सुरक्षित अंतर राखले जाईल. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे आदी मार्गदर्शक सूचना गृह विभागाने दिल्या आहेत.

या मार्गदर्शक सूचना प्रत्येकाने विचारात घ्याव्यात. कारण आपला कोरोनाशी असलेला मुकाबला अद्याप संपलेला नाही. ओमिक्रॉनची रुग्ण संख्या वाढत आहे. त्याचा योग्य विचार करुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्याच लागत आहेत. यात प्रामुख्याने दोन डोस घेणे, मास्क वापरणे, सॅनीटायझरचा वापर, योग्य व सुरक्षित अंतर याचे भान ठेवावे.

सामाजिक भान सार्वजनिक ठिकाणी वावरताना कसे वागावे? कसे चालावे? बोलावे ? काय सामाजिक भान ठेवावे? याची आचारसंहिता असते. त्याचे पालन करावे. घरापासून, आपल्या प्रदेशापासून थोडे दूर विशेषत: पर्यटन अथवा अन्य कामासाठी आपण आलो की थोडे मोकळेपणा येतो आणि मनातील अतिसुप्त गुणांना वाव मिळतो.

विशेष म्हणजे मित्रवर्ग सोबत असेल तर आणखी जास्त उधाण येते. नववर्षाचे स्वागत करताना हे जरा जास्तच होते. कुठल्याही प्रकारची नशेबाजी करुन अतिउत्साहामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे उचित ठरेल. मद्यपान करुन समुद्रामध्ये पोहण्यास जाणे टाळावेच तसेच पोहण्यास येत असेल नसेल तरीही खोल समुद्रामध्ये पोहण्यास जाण्याची जोखीम घेऊ नका, स्थानिकांच्या तसेच किनाऱ्यावरील जीवरक्षकांच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या.

आपल्यामुळे इतरांच्या उत्साहास त्रास होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. नववर्षाच्या या आनंददायी सोहळ्यास अनुचित प्रकाराच्या निमित्ताने गालबोट लागणार नाही हे पहावे आणि आनंदाने नववर्षाचे स्वागत करावे.

वाहन असो की फटाके आनंदाच्या भरात याचा आवाज किती मोठा होतो हे अनुभवल्या शिवाय कळत नाही. प्रदूषणाचा कळस होतो. इतरांना त्याचा त्रास होतो. हे त्यावेळी समजत देखील नाही. तेव्हा पर्यटन, नववर्ष साजरे करताना अगदी आपल्याकडून हे टाळलेच पाहिजे.

विशेषत: कोकणात फिरायला जातांना समुद्राचे आकर्षण असलेली बरीच हौशी पर्यटक मंडळी अथांग सागर व किनारा पाहून भारावून जातात, आणि मग स्विमींग चॅम्पियन असल्यासारखे वागून पाण्यात स्वत:ला झोकून देतात. इथेच मोठा घोटाळा होतो. उत्साहाच्या भरात आपण समुद्रात किती लांबवर आलो ते कळत नाही.

शेवटी जे नको ते होते. तेव्हा सागर किनारी, बीचवर लावण्यात आलेल्या सूचनांचे पालन कराच. जान है तो जहान है…. नववर्ष पुढील वर्षीही येणार आहेच. म्हणून यावर्षी नववर्षाचे स्वागत करताना कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करा. शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करुन आपला आनंद द्विगुणित करा.

Ahmednagarlive24 Office