अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- मुलीच्या साखरपुड्याचे निमंत्रण देण्यासाठी नातेवाईकांकडे आलेल्या पतीपत्नीस गडबडीत गाडी लॉक न करणे चांगलेच महागात पडले आहे.
कारण उघड्या असलेल्या गाडीतून चोरट्यांनी १ लाख १६ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना पारनेर तालुक्यात घडली आहे.त्यामुळे गाडी लॉक न करणे या दाम्पत्याच्या चांगलेच महागात पडले आहे.
याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडी येथील पानमंद दाम्पत्य मुलीच्या सारखपुड्याचे आमंत्रण देण्यासाठी रांधे येथील नातेवाईक दत्तात्रय टावरे यांच्याकडे आले.
त्यांनी आपली स्वीफ्ट ही गाडी रस्त्याच्या कडेला लावून नातेवाईकांच्या घरी गेले. मात्र या गडबडीत त्यांच्याकडून गाडीचे दरवाजे लॉक करण्याचे विसरून गेले.
नेमक्या याच संधीचा फायदा घेवून अज्ञात भामट्याने गाडी उघडून आतमध्ये असलेली दागिन्यांची पर्स लंपास केली. गाडीत आपली दागिन्यांसह पर्स राहील्याचे लक्षात येताच पानमंद यांची लगेच गाडीत येवून पाहीले,
मात्र तोपर्यंत चोरट्याने आपला डाव साधला होता. याबाबत शितल दादासाहेब पानमंद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोहेकॉ कदम हे करत आहेत.