अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- जगात दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान म्हणून शिर्डीच्या साईबाबा मंदिराकडे बघितले जाते. आज त्याठिकाणी विश्वस्त मंडळ स्थापन करताना प्रामुख्याने साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी विकासाचा सुक्ष्म दृष्टीकोन असणारीच व्यक्ती नेमावी,
राज्यात अनेक तरुण नेतृत्व आहेत, त्यात महाविकास आघाडीतदेखील अनेक चांगले आणि कर्तबगार नेते असून कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी अल्पावधीतच विकासाची दूरदृष्टी साधून राज्यभरात नावलौकिक प्राप्त केला असल्याने त्यांना साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात यावे,
अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे जिल्हा उपाध्यक्ष राकेश कोते यांनी पत्राद्वारे केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवलेल्या पत्रात राकेश कोते यांनी म्हटले आहे, की साईबाबांवर श्रद्धा असलेले लाखो करोडो भक्त आज जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत.
साईबाबा संस्थानकडून जगाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भक्तांसाठी प्राथमिक सुविधादेखील उपलब्ध करुन देता आलेल्या नाही.अनेक त्रूटी आजही येथे जाणवतात. त्यावर वेळोवेळी सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करत असतात.
आपले महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम करत आहे. सरकारच्या अधिकारात येणाऱ्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या माध्यमातूनदेखील भाविक आणि जनतेच्या हिताचे काम व्हावे, ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ओळख ही विकासात्मक दृष्टीकोन असणारा आणि युवकांना संधी देणारा पक्ष म्हणून आहे. आपण वेळोवेळी युवकांना संधी देवुन त्यातून अनेक नेते घडवले आहे.
कर्जत जामखेडमध्ये जे एका मंत्र्याला जमले नाही, ते काम अवघ्या वर्षभरात आमदार रोहित पवार यांनी करुन दाखवले. त्यामुळे त्यांना साईसंस्थानवर संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.