ते अनधिकृत फलक हटवले इतर फलकाचे काय? भाजपचा मनपाला सवाल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-  नगर शहरात सुरू असलेल्या कोरोनावरील लसीकरणाची भाजपकडून जाहिरात केली जात आहे. भाजपने ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘धन्यवाद मोदीजी’ अशा आशयाचे फलक लावले होते. मात्र मनपाची रीतसर परवानगी घेतली नसल्याने हे सर्व फलक तातडीने हटविण्यात आले आहे.

जाहिरात फलकांवर कारवाई केल्याने भाजपमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे विनापरवाना फलकांवर कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे. त्यामुळे महापालिका आता विनापरवाना फलकांवर कारवाई करणार का, असा प्रश्न या निमत्ताने उपस्थित झाला आहे. शहरासह उपनगरांत राजकीय पक्षांचे मोठेमोठे फलक लावण्यात आले आहेत.

शहरातून जाणारे महामार्ग जाहिरात फलकांनी झाकोळून गेले आहेत. शहरातील प्रमुख चौकात राजकीय नेत्यांचे वाढदिवस, निवडीबद्दल अभिनंदन, नेत्यांचे स्वागत, यांसह अनेक अनधिकृत फलक लावण्यात आले आहेत. महापालिकेने लॉकडाऊननंतर प्रथमच अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे.

ही कारवाई सुरू असतानाच, मंगळवारी पालिकेने भाजपचे चार ठिकाणचे फलक हटविले. महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे अनेक फलक शहरात लावलेले आहेत. हे फलक लावताना महापालिकेची परवानगी घेतली गेली नाही.

या फलकांवर पालिकेने कारवाई केली नाही. परंतु अचानक भाजपाच्या फलकांवर कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पालिकेने ही कारवाई सुरू ठेवली नाही. पालिकेने फलकांवरील कारवाईची मोहीम गुंडाळली यामुळे चर्चाना उधाण आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24