अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- कोरोनात राज्य सरकार आरोग्याची काळजी घेत होते. मृत्यूचे आकडे लपवले नाही. खरे बोलून पारदर्शी काम केले. ज्यांनी आकडे लपवले त्यांची स्मशानभूमी लपली नाही. हे सर्वांनी पाहिले.

यामुळे भारतीय जनता पक्षाचा विचार जनतेच्या हिताचा नाही. राम मंदिर बांधले पोटाचे काय?, लोकांची भूक महत्त्वाची आहे. त्यांच्या मुलांचे शिक्षण महत्त्वाचे आहे. मात्र धर्मांच्या नावावर मते मिळवण्याचे काम सुरु आहे.

राम मंदिर बांधून प्रश्न सुटणार नाही, अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली. तालुक्यातील देवकौठे येथे शनिवारी विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री थोरात बोलत होते.

अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. नगराध्यक्ष दुर्गा तांबे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, थोरात कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, सभापती सुनंदा जोर्वेकर, मीरा शेटे, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, विष्णुपंत रहाटळ, भारत मुंगसे, भागवत आरोटे,

सुभाष सांगळे, राजेंद्र मुंगसे, नामदेव आरोटे, राजेंद्र कहांडळ, ज्योती मोकळ, रामनाथ शेवकर यावेळी उपस्थित होते. मंत्री थोरात म्हणाले, १० महिन्यापासून पंजाब व हरियाणाचे शेतकरी आंदोलन करीत आहे.

विविध मागण्यांसाठी लाखो शेतकरी एकत्र आले. त्यांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सरकारची असते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी साधी चर्चा करायला तयार नाही. उलट पाण्याचा मारा व लाठी चार्ज करून आंदोलकांना जखमी केले जात आहे.

या घटनेची बातमी प्रसिद्ध होत नाही, हे भाजप सरकार आहे. काँग्रेसचा विचार सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे. महात्मा गांधींचे विचार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्य घटना यातूनच आपण पुढे जाऊ शकतो, असे मंत्री थोरात यांनी सांगितले.