Purandar Airport : तब्बल चार वेळा रद्द झालेला जेजुरीतील ‘शासन आपल्या दारी’ हा शासनाचा उपक्रम आज सोमवार, (दि. ७) रोजी अखेर होत आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती निर्मला गोऱ्हे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार आणि सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहे.
पुरंदर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री सलग दुसऱ्यांदा पुरंदरला येत आहेत. साहजिकच माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या दृष्टीने त्यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात असून, आजच्या दौऱ्यात मुख्यमंत्री कोणत्या घोषणा करणार, याकडे पुरंदरवासीयांचे विशेष लक्ष लागले आहे.
पुरंदरमधील बहुचर्चित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प पाच वर्षांपासून रखडला असून, यावर मुख्यमंत्री कोणता निर्णय घेणार, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. कुंभारवळण, एखतपूर मुंजवडी, वनपुरी, उदाचीवाडी, खानवडी, पारगाव या सात गावांत प्रकल्प मंजूर झाल्यानंतर, त्यास आजपर्यंत जोरदार विरोध झाला आहे.
त्यानंतर आमदार संजय जगताप यांनीही या जागेला विरोध करीत तालुक्याच्या पूर्व भागातील नायगाव, राजुरी, पिसर्वे या भागातील जागा सुचवली आहे. तसेच, ही जागा योग्य असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, माजी राज्यमंत्री पूर्वीच्याच जागेवर प्रकल्प करण्यावर ठाम आहेत. यामुळे या प्रकल्पाबाबत अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही.
मागील वर्षी महाविकास आघाडीची सत्ता जाऊन एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार येताच विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला. एवढेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सासवडच्या पालखीतळावर जाहीर सभा घेऊन त्यांनी पूर्वीच्याच जागेवर प्रकल्प होणार असल्याचे जाहीर केले होते.
या सभेला एक वर्ष पूर्ण झाले असून, एक वर्षानंतर मुख्यमंत्री पुन्हा पुरंदरला येत आहेत. विशेष म्हणजे, आज होणारा कार्यक्रम वेगवेगळ्या कारणामुळे तब्बल तीन वेळा रद्द झाला असून, आज होत आहे. यासाठी विजय शिवतारे यांनी विशेष लक्ष घातले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या प्रकल्पाबाबत आग्रही असून, सर्व प्रकारची मंजुरी प्रक्रिया झाली आहे. एकंदरीत तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या घोषणा करणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.