अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- मध्यंतरी झालेल्या अहमदनगर मनपा स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म पाळून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि आगामी महापौर पद शिवसेनेला द्यायचे असे ठरलेले होते. वरिष्ठ पातळीवर पक्ष श्रेष्ठी आणि स्थानिक राष्ट्रवादीचे नेते, विद्यमान आमदार यांची या संदर्भात आपसात चर्चा झालेली होती. असे असताना नगर शहर शिवसेनेतील एका गटाने विजय पठारे यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितला.
आणि पक्षश्रेष्ठींनी आदेश देऊनही उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत टाळाटाळ केली. परिणामी सहयोगी पक्षाच्या नेत्यांनी वेगळी भूमिका घेण्याचा विचार सुरु केल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार विजय पठारे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. जर मनपा सभापती आणि महापौर पदाबाबत उभय पक्षात तडजोड झाली असताना शिवसेनेच्या एका गटाने उमेदवार देऊन काय साध्य केले.
या प्रकरणात वरिष्ठांकडे तक्रार करून विनाकारण संपर्क प्रमुख आणि आणि अन्य नेत्यांना नाहक बदनाम करण्याचे कारस्थान केले जात होते. हे प्रकार तात्काळ थांबवा असे कळकळीचे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी प्रसिध्दीपत्रक काढून केले आहे. मनपा सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसनेच्या एका गटाने दिलेल्या त्रासाचा वचपा जर महापौर पदाच्या निवडणुकीत सहयोगी पक्षाने काढण्याचे ठरवले तर हे कृत्य आपणास काय भावात जाईल याचा त्या गटाने विचार करावा.
महापालिकेत शिवसेनेला सत्ता मिळूच नये यासाठी हे चालले आहे का? याचा सूत्रधार शोधावा आणि पक्ष श्रेष्ठीनी यात जातीने लक्ष घालून पक्ष विरोधी कारवाया करून वरिष्ठ नेत्यांना नाहक बदनाम करणार्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवावा अन्यथा नगर शहरात शिवसेना नो व्हेअर होऊ शकते अशी भीती लहामगे यांनी व्यक्त केली आहे.
अहमदनगर महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत आपल्या कडे बहुमत असेल आपली ताकद असेल तर निवडणूक लढविणे योग्य अन्यथा पराभवाची नामुष्की सहन करून राज्यात सत्तेत असतांना सेनेला साधा मनपा सभापती करता आला नाही अशी बदनामी करून घेण्यात काय अर्थ आहे. त्यापेक्षा या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी यशस्वी वाटाघाटी करून सभापती पद राष्ट्रवादीला दिले आणि महापौर पद आपल्याकडे घेण्याचा निर्णय झाला.
हा निर्णय संपर्क प्रमुखांनी नगरच्या स्थानिक नेत्यांना कळवला. तरी देखील या सभापती पदाच्या निवडणुकीत केवळ अर्थपूर्ण व्यवहार व्हावा या गलिच्छ उद्देशाने उमेदवार देण्याचा घाट कुणी घातला याचा शोध घेणे गरजेचे आहे. वास्तविक नगर शहर शिवसेनेत गटबाजी मोठ्या प्रमाणात उफाळून आली आहे. हिंदू धर्मरक्षक आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या अकाली जाण्याने शिवसेनेत निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याचे काम संपर्क प्रमुख अतिशय चांगल्या पद्धतीने करीत आहेत.
मात्र सभापती पदाच्या निवडीबाबत आम्हाला अंधारात ठेवल्याचा आरोप करीत या राष्ट्रवादीशी वाटाघाटीचा निर्णय अमान्य असलेले युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विक्रम राठोड, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर ,माजी महापौर अभिषेक कळमकर ,नगरसेवक योगीराज गाडे,नगरसेवक बाळासाहेब बोराटे,दत्ता जाधव , अमोल येवले , अशोक दहिफळे , रमेश परताणी परेश लोखंडे यांनी थेट मुंबई गाठली . वर्षा आणि मातोश्रीवर जाऊन उद्धव साहेबांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांना ती भेट न मिळाल्याने त्यांनी शिवालयात जाऊन शिवसेना सरचिटणीस अनिल देसाई यांची भेट घेतली. आणि त्यांच्यासमोर पक्ष नेत्यांना , संपर्क प्रमुखांना नाहक बदनाम करण्यार्या खोट्या तक्रारी केल्या. प्रत्यक्षात स्व. आमदार अनिल राठोड समर्थक गटाला राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेण्यात आजिबात स्वारस्य नाही. यामुळे पक्ष कितीही मागे गेला तरी त्यांना चालण्यासारखे आहे.
पालिकेत 23 संख्याबळाच्या आधारे सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या शिवसेनेला पालिकेत अनिल भैय्या हयात असतांना सत्ता का आणता आली नाही. राष्ट्रवादी आणि भाजपला परंपरागत वैरी मानून आपण पालिकेची सत्ता घालवली . आता सेनेचा एक गट राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात आगामी महापौर पद पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहे. मुंबईत बसलेल्या पक्ष श्रेष्ठीना देखील सेनेचा महापौर होण्यात स्वारस्य आहे तरी देखील सेनेचा दुसरा गट या उद्देशाला सुरुंग लावण्याच्या प्रयत्नात सतत आहे.
युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष पद स्वतःकडे असतांना युवासेना वाढीकडे लक्ष ने देता मातृ संस्थेत व्यर्थ लुडबुड करून बालिश पद्धतीने राजकारण करणार्यांनी स्वतःला यापासून परावृत्त करणे गरजेचे आहे. अन्यथा पक्षाला याची मोठी किंमत मोजावी लागेल. जिल्हाप्रमुख हे बेअसरपणे वागुन कुठल्या धुंदीत मग्न असतात याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे व संघटने कडे लक्ष द्यावे तसेच शहरप्रमुख हे संघटनेसाठी किती हिताचे आहेत कि नाही हे देखील वरिष्ठांनी तपासुन घ्यावे.
प्रथम महापौर पद भूषविणार्याना आता पालिकेत सेनेची सत्ता आणण्यात नाही तर मराठा विरुद्ध ओबीसी असे सततचे लॉबिंग पक्षात कसे धुमसत राहील यातच स्वारस्य असल्याचे दिसते आहे. राष्ट्रवादी कडून महापौर पदाची माळ गळ्यात पाडून धन्य झालेल्यानी पुढे साधी नगरसेवक पदाची निवडणूक लढविण्याची हिम्मत दाखवली नाहीत .उलट स्व संरक्षणासाठी सेनेत कोलांटी उडी मारली आणि संपर्क प्रमुखांना पक्ष निष्ठा शिकवायला लागले .
प्रत्यक्षात त्यांनी सेनेत आपले वय तपासावे आणि नंतर निष्ठावंत संपर्क प्रमुखांच्या पक्ष निष्ठेबाबत शंका घ्यावी. एके काळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नगरसेवक असलेले आणि मनपा निवडणुकीत एकाचवेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा ए बी फॉर्म हातात ठेऊन शेवटी एन सी पी कडून अर्ज भरून सेना नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे विद्यमान सेनेचे नगरसेवक आपल्या हितासाठी कसे उलटे पालटे उद्योग करीत आहेत हे सर्व श्रुत आहेच.
मनपा निवडणुकीत कोणताही राजयोग नशिबी नसताना कोर्ट कचेर्या करून पोटनिवडणूक ज्यांनी लढवली आणि विरोधी पक्षाशी आतून हातमिळवणी केली. संपर्क प्रमुखांना प्रचारात रात्रीचा दिवस करायला लावला आणि निवडून आले तरी याची जाणीव न ठेवता संपर्क प्रमुखाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करण्याचा बालिशपणा करणे हे हास्यास्पद आहे. वास्तविक त्यांना पुढील राजकारणात सुबुद्धी येण्याचा योग जुळवून येणे अत्यंत आवश्यक आहे.
सध्या राठोड यांची जागा घेण्याचा व्यर्थ प्रयत्न करीत असलेले पक्ष विरोधी कृत्य करण्यात अहोरात्र मग्न आहेत त्यानं साथ देणारे स्वयं घोषित उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव हे अनिल भैय्या हयात असतांना सेनेत दुफळी निर्माण करून हिंदूधर्मरक्षक अनिल भैय्या यांच्या मनात इतरांविषयी विष कळविण्याचे काम करीत होते . त्यांना देखील मला पहा आणि फुले वहा या भ्रमाची लागण झाली आहे.
आता पक्षात जर हे प्रकार असेच सुरु राहिले आणि जर आपण पुन्हा महा आघाडीतील मित्र प्रक्षांशी जुळवून घेतले नाही तर राज्यात आपणास सत्तेपासून दूर ठेवणार्या पक्षाचे फावेल आणि नगर शहारत पुन्हा अल्पमतात असलेला पक्ष मोठा झाल्याचे दिसेल . आगामी काळात याची फार मोठी किंमत या भ्रम वेड्या व्यक्तीमुळे आपणास मोजावी लागण्याची शक्यता आहे तेव्हा पक्ष श्रेष्ठी नार्वेकर साहेब,देसाई साहेबानी वेळी सावध होऊन नगर शहर शिवसेनेला लागलेली जळमटे साफ करून स्वच्छता मोहीम हाती घेण्याची नितांत गरज आहे.
सेना आणि राष्ट्रवादी मध्ये मध्यंतरीच्या काळात आलेला दुरावा कमी करून पालिकेत महा विकास आघाडीचा झेंडा फडकविण्याच्या प्रयत्नात असलेल्या संपर्क प्रमुखांचा निरपेक्ष उद्देश धुळीस मिळविण्याचे कारस्थान कोण रचत आहे याचा नेमका शोध घेऊन त्या झारीतील शुक्राचार्याना तात्काळ बाजूला करणे क्रमप्राप्त आहे अन्यथा एकेकाळी कम्युनिष्ठांच्या जिल्ह्यात असलेला सेनेचा बालेकिल्ला उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
अशी भीती लहामगे यांनी व्यक्त केली आहे. निष्ठावंत शिवसैनिकांचा एक गट हा संपर्कप्रमुखांच्या मागे ठामपणे उभा आहे. लवकरच आपण स्थानिक सेना नगरसेवक आणि नेत्यांना एकत्र करून पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे, आदित्य साहेब ठाकरे तसेच सरचिटणीस नार्वेकर साहेब, देसाई साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे लहामगे यांनी प्रसिध्दीपत्रकार म्हंटले आहे.