ताज्या बातम्या

काय सांगता… त्या पठ्ठ्याने चक्क साडेतीन एकरांत फुलवली अफूची शेती

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022  Maharashtra News :-जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील वाळकी याठिकाणी एका शेतकऱ्यानं साडेतीन एकरावर अफूची शेती लावली. पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी केली.

प्रकाश सुधाकर पाटील असं अफूची शेती करणाऱ्या 40 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. ते चोपडा तालुक्यातील वाळकी येथील रहिवासी आहेत.

दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मागील दोन दिवसांपासून पोलीस अफूचं पीक उपटण्याचं काम करत आहेत. आतापर्यंत एक हजार गोणी अफू उपटला आहे.

अजूनही अंदाजे 500 गोणी अफू बाकी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या अफूची किंमत जवळपास आठ कोटी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

प्रकाश पाटील याने आपल्या दीड एकर शेतात आणि भागवत पितांबर पाटील (रा. घोडगाव) यांच्याकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या दोन एकर शेतीत अफूची लागवड केली होती. दरम्यान त्यांनी आपल्या शेतात अफूची लागवड केल्याची गुप्त माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी आरोपी पाटील यांच्या शेतात छापेमारी केली. यावेळी तब्बल साडेतीन एकरावर फुललेली अफूची शेती पाहून पोलीसही भारावून गेले.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शेतकरी प्रकाश पाटील यांना ताब्यात घेतलं आहे. तसेच 40 पोलीस शिपाई, 15 होमगार्ड आणि 10 स्थानिक मजुरांच्या मदतीनं अफूची झाडं जप्त करण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत एकूण एक हजार गोण्या अफू जप्त करण्यात आला आहे.

दोन दिवसानंतरही हे काम सुरू असून आणखी 500 गोणी अफू उपटण्याचा बाकी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office