काय सांगता… चक्क शेतकऱ्याने बिबट्याला खोलीत डांबून ठेवले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- संगमनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने बिबट्या पकडला जावा म्हणून त्याला शेळ्या असलेल्या गोठ्यातच कोंडले. वनविभागाने त्याला पकडले खरे, मात्र तोपर्यंत त्याने गोठ्यातील आठ शेळ्या ठार केल्या.

जीवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने बिबट्याला शेळ्यांच्या खोलीत कोंडल्याची ही घटना संगमनेर तालुक्याच्या पठारभागात वनकुटे येथे घडली. प्रकाश रेवजी हांडे असं या धाडसी शेतकर्‍याचं नाव आहे. प्रकाश रेवजी हांडे हा शेतकरी वनकुटे गावाजवळ असलेल्या कळमजाई वस्ती येथे राहतो.

हांडे यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. शुक्रवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या शेळ्या एका खोलीत कोंडल्या होत्या. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्या त्या ठिकाणी आला, आणि तो खोलीत गेला. तेथे शेळ्यांवर हल्ला केल्यामुळे त्या ओरडू लागल्या.

त्यामुळे हांडे हे झोपेतून जागे झाले व घराच्या बाहेर आले, आणि त्यांनी खोलीच्या दिशेने धाव घेतली. खोलीच्या आतमध्ये पाहिले असता, त्यांना बिबट्या समोर दिसला. खोलीतील काही शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला होता. हांडे यांच्याकडेही बिबट्याने धाव घेतली. मात्र हांडे यांनी खोलीचा दरवाजा बंद केला.

हांडे यांनी ही माहिती वनविभागाच्या अधिकार्‍यांना दिली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पिंजरा घेवून गेले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने काही नागरिकांच्या मदतीने पिंजरा खोली जवळ लावला. जवळपास तीन ते चार तासानंतर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद होताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

अहमदनगर लाईव्ह 24