अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- आज कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. सर्वच उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे अनेकजण आर्थिक संकटाचा सामना करत आहे.
मात्र या सर्व अडचणीच्या काळात देखील जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील रिलायन्स पेट्रोल पंपाच्यावतीने कोरोना काळात सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकासह ऑक्सिजन सिलिंडर वाहतूक करणाऱ्या वाहनांना दररोज ५० लिटर इंधन पूर्णपणे मोफत देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेडने हा उपक्रम देशभर राबविला जात आहे. कोरोनाच्या काळात प्रत्येकजण मदतीसाठी पुढे येत आहे, याकाळात एकमेकाला सहाय्य करण्याचे आवाहन केले जात असताना रिलायन्स कंपनीने अत्यंत मोठा निर्णय घेतला.
देशातील आपल्या पेट्रोल पंपावर कोरोना काळात सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका व ऑक्सिजन सिलिंडर वाहतुक करणाऱ्या वाहनांना दररोज मोफत डिझेल,पेट्रोल देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील रिलायन्स पंपावर दररोज ५० लिटर डिझेल अथवा पेट्रोल मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी सर्व रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.