अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या सीधी जिल्ह्यात बस कालव्यात कोसळून ५० प्रवाशांचा मृत्यू झाला. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान मृतांच्या कुटुंबांचं सांत्वन करण्यासाठी सीधीमध्ये पोहोचले.
त्यावेळी त्यांचा मुक्काम शासकीय अतिथीगृहात होता. यावेळी अतिथीगृहामध्ये असलेल्या अस्वच्छतेमुळे शिवराज सिंह चौहान यांना रात्रभर डास चावले.याशिवाय टाकीमधून पाणी ओव्हर फ्लो होत होतं.
आता या प्रकरणी प्रशासनानं कारवाई केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री चौहान यांना मच्छर चावल्यानं एका अभियंत्याला निलंबित करण्यात आलं आहे. १७ फेब्रुवारीला हा प्रकार घडला.
गेस्ट हाऊसमध्ये साफसफाई न केल्यामुळं अभियंत्याला कामावरुन निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री भोपाळमध्ये परत आल्यानंतर मंत्रालयातील उच्च अधिकाऱ्यांना गेस्ट हाऊसमध्ये त्यांना आलेल्या अडचणी समजल्या.
सर्किट हाऊसचे प्रभारी अभियंता यांना निलंबित करण्यात आलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्रकुमार सिंग यांच्या २ वार्षिक वेतनवाढीवर बंदी घालण्याचा आदेश जारी करताना रेवा आयुक्त राजेश जैन यांनी सर्किट हाऊसचे प्रभारी उपायुक्त बाबूलाल गुप्ता यांना त्वरित निलंबित केलं आहे.
याचा फटका जिल्ह्यातील अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सहन करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि एसपी देखील त्यांच्या कचाट्यात येऊ शकतात.