अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार की नाही याविषयी तज्ज्ञांमध्येही अनेक मतभेद आहेत.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा वेग पाहता काही जाणकारांनी पुढील एक ते दोन महिने कोरोना रुग्णांची ही वाढ कायम राहिल असं म्हटलंय.
दरम्यान महाराष्ट्रातील 36 पैकी तब्बल 28 जिल्ह्यांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे.
10 दिवसांपूर्वी राज्यातील कोरोना संसर्गाने डोकं वर काढलेल्या जिल्ह्यांची संख्या 21 वर होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि राज्य सरकार अलर्ट झालं आहे.
त्याचाच परिणाम म्हणून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधत काळजी घेण्याचं आवाहन केलं.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
अनेक नवे कोरोना हॉटस्पॉट तयार होत आहेत. यात अमरावीत, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे.
मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्येही आता कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
फेब्रुवारी महिन्यात आलेल्या कोरोनाच्या नव्या लाटेचा केंद्रबिंदू विदर्भच असल्याचं सध्यातरी दिसतंय.
राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
मागील आठवडाभरापासून वाढणारे कोरोना रुग्ण पाहता यावर नियंत्रणासाठी केवळ लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे की इतर काही यावरही विचार केला जातोय.
मात्र, सध्या तरी राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना हॉटस्पॉट सापडत आहेत तेथे कठोरपणे निर्बंध लादले जात आहेत. मात्र, सरसकटपणे लॉकडाऊन लावणं सरकार टाळत आहे.