अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- महाविकास आघाडी सरकारने मागील 16 महिन्यांत जाहिरातीवर तब्बल 155 कोटी खर्च करण्यात आले आहे. या खर्चात जवळपास 5.99 कोटी रुपये सोशल मीडियावर खर्च केले आहेत.
प्रत्येक महिन्याला प्रसिद्धी मोहिमेवर ठाकरे सरकार 9.6 कोटी खर्च करत आहे, अशी माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आल्याचं म्हटलं आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून आजमितीला प्रसिद्धी मोहिमेवर करण्यात आलेल्या विविध खर्चाची माहिती मागितली होती.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अनिल गलगली यांना 11 डिसेंबर 2019 पासून 12 मार्च 2021 या 16 महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर केलेल्या खर्चाची माहिती उपलब्ध करुन दिली आहे.
यात 2019मध्ये 20.31 कोटी खर्च करण्यात आले असून नियमित लसीकरण प्रचारावर सर्वाधिक 19.92 कोटींचा खर्च झाला आहे. दरम्यान याबाबत अनिल गलगली यांनी म्हटलं आहे कि,
‘माहिती आणि जनसंपर्क महासंचलनालयाकडे 100 टक्के माहिती उपलब्ध नसल्याने ही आकडेवारी वाढूही शकते.
सोशल मीडियाच्या नावाखाली केलेला खर्च हा संशयास्पद आहे. त्याशिवाय क्रिएटिव्हच्या नावाखाली दाखवलेल्या खर्चाचा हिशोब वेगवेगळ्या शंकांना वाव देणारा ठरतो आहे.’