अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ कोरोनाने देशभर कहर केला आहे. यामुळे संपूर्ण व्यवस्था कोलमडली आहे. यातच कोरोनाची पहिली व त्याहूनही दुसरी लाट अधिक घातक ठरली होती. त्यानंतर आता तिसऱ्या लाटेबाबत अनेक तज्ज्ञांनी आपली मात्र नोंदवली आहे.
यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका नीती आयोगानं व्यक्त केलाय. पुढच्या महिन्यात साधारण कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असं नीती आयोगाचं म्हणणं आहे. तिसऱ्या लाटेत दररोज चार ते पाच लाख रुग्णांची नोंद होऊ शकते, असा अंदाज नीती आयोगाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच पुढच्याच महिन्यात दोन लाख आयसीयू बेड्सची गरज भासू शकते, असंही नीती आयोगानं सांगितलं आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नीती आयोगानं यंत्रणेला काही महत्त्वाच्या शिफारशीही केल्या आहेत. आयोगाचं म्हणणं आहे की, कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचा सामना करणाऱ्यासाठी आपल्याला आधीपासूनच तयार रहावं लागेल.
सप्टेंबरपर्यंत दोन लाख आयसीयू बेड्स तयार करणं अत्यंत आवश्यक असल्याचंही निती आयोगानं म्हटलं आहे. याव्यतिरिक्त 1.2 लाख व्हेंटिलेटर असणारे आयसीयू बेड, 7 लाख ऑक्सिजन बेड्स आणि 10 लाख कोविड आयसोलेशन केअर सेंटर असणं आवश्यक आहे.
नीती आयोगानं यापूर्वी सप्टेंबर 2020 मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तेव्हाही निती आयोगानं प्रत्येकी 100 रुग्णांपैकी जवळपास 20 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासेल असा अंदाज व्यक्त केला होता.
परंतु, कोरोनाची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेहून अधिक भयावह असेल, असा अंदाज वारंवरा तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशातच निती आयोगाकडून व्यक्त करण्यात आलेला अंदाजही अत्यंत भयावह आहे.