अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :-आजही अनेक गुन्हे पोलिसात दाखल केले जात नाहीत. कारण बहुतांश वेळा गुन्हा दाखल झाल्यानंतर कित्येक दिवस, महिने कधी कधी तर वर्ष असेच जातात मात्र गुन्हेगारांचा तपास लागत नाही.
त्यामुळे ‘गुन्हा दाखल करून करणार तरी काय’ असा विचार करून अनेकजण गुन्हा दाखल करत नाहीत. मात्र नुकतेच पोलिसांनी गुन्हा केल्यानंतर अवघ्या ८ मिनिटांत एका आरोपीला अटक केली आहे.
होय.. ही सिनेमातील कहाणी नाही तर जालना जिल्ह्यात एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत अटक केली.
जालना जिल्ह्यातील गोंदी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर असे की, जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या थिर्थपुरी येथे एसबीआय बँकेचे एटीएम मशिन एका इसमाने फोडण्याचा प्रयत्न केला. त्याला यश आले नाही. या
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. येथे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा फोटो घेतला. या फोटोच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या ८ मिनिटांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.