अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- कोरोना आणि त्यानंतर सुरु झालेलं लॉकडाऊन यामुळे अनेकांच्या नौकऱ्यांवर गदा आली तर अनेकांचा उद्योग व्यवसाय ठप्प झाला. बेरोजगारीचा सामना करावा लागला.

मात्र काहींनी या गोष्टी डावलून व्यवसाय पुन्हा सुरु केला. मात्र नाशिक मध्ये बेरोजगार झालेल्या काही तरुणांनी चक्क एक असा उद्योग केला ज्यामुळे संपूर्ण नाशिकात चर्चा रंगल्या आहेत.

कलर प्रिंटिंगचा व्यवसाय बंद असल्याने चक्क बनावट नोटांचा छापखाना सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे.

नाशिक पोलिसांनी हा छापखाना उद्ध्वस्त केला असून या प्रकरणात एकूण सात जणांना अटक केली आहे. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील तरूणांचा कलर प्रिंटींगचा व्यवसाय आहे.

कोरोना टाळेबंदीमुळं त्यांचा व्यवसाय हा बंद पडला आहे. बेरोजगार तरूणांनी शक्कल लढवत बनावट नोटांची छपाई केली आहे. त्यांचा हा सर्व प्रकार लक्षात आल्यावर पोलिसांनी छापा टाकत सात तरूणांना अटक केली आहे.

या बनावट नोटांचे धागेदोरे लासलगावच्या विंचूरपर्यंत पसरले आहेत. अटक झालेल्या तरूणांनी आतापर्यंत लाखो रूपये किंमतीच्या नोटा छापल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून हे तरूण नोटांची छपाई करत होते.

हे सर्व तरूण अगदी नियोजन पद्धतीने नोटा छापून बाजारात चलनात वापरायचे. त्यांच्या शेजारील व्यापाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून बनावट नोटा आढळत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी सर्व तरूणांचा कारनामा उघडकीस आणला.