असे काय झाले कि नरेंद्र मोदी मंदिरातील मोदींचा पुतळा रातोरात हटवला?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- पुण्यात औंध परिसरात एका भाजप कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारल्याचे चर्चा पुणे शहरात झाली होती. या मंदिरात नरेंद्र मोदी यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला होता.

मात्र आता हा पुतळा रातोरात हटवण्यात आला असून मंदिर देखील झाकून ठेवण्यात आले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मंदिराजवळ पोहोचले असता, मोदींचा पुतळा भाजप कार्यालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर पुण्यात चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिराची उभारणी करण्यात आली. औंध गावातील ॲड. मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून मयूर मुंडे व आणि कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव म्हणून मोदी मंदिर उभारलं.

या मंदिरात नरेंद्र मोदी यांचा अर्धाकृती संगमरवरी पुतळा बसवण्यात आला. परिसरातील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते 15 ऑगस्टला मंदिराचे उद्घाटन करण्यात आलं. या मंदिराबाबतच्या बातमीची देशात चर्चा झाली. यावर बरीच टीकादेखील झाली. त्यानंतर भाजप नेतृत्त्वानं याची दखल घेतली.

पंतप्रधान कार्यालयाकडून कानपिचक्या मिळाल्यानंतर हे मंदिर हटविण्यात आले असल्याची सूत्रांकडून माहिती समोर येत आहे. आज सकाळी अचानक मंदिर झाकण्यात आल्याचे आणि त्यातील मोदींचा पुतळा मुसळे यांच्या कार्यालयात नेण्यात आल्याचे समोर आले.

पंतप्रधान मोदींचा पुतळा हटवण्यात आल्याची माहिती समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंदिराजवळ धाव घेतली. त्यांनी या भागात उपरोधिक आंदोलन केलं. ‘देशापुढे असलेले प्रश्न सुटावेत यासाठी आम्ही साकडं घालायला मंदिरात आलो होतो. मात्र भाजपचा देव काही केल्या आम्हाला दिसत नाहीए.

पेट्रोल, डिझेल, सिलिंडरचे दर कमी होऊ दे, यासाठी नवस बोलायला आम्ही इथे आलो. पण देवच दिसत नसल्यानं आम्हाला अगदी भरून आलं,’ अशी टोलेबाजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. देव चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अहमदनगर लाईव्ह 24