अफगाणिस्तानात आतापर्यंत काय काय घडलं?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :-  अफगाणिस्तान अखेर तालिबानच्या ताब्यात गेले आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडला आहे. अफगाणिस्तानमधील न्यूज चॅनेल टोलो न्यूजने सूत्रांद्वारे ही माहिती दिली आहे.

तालिबानच्या प्रतिनिधींसोबत काबुलमधील चर्चेनंतर गनी यांनी हा निर्णय घेतला. गनी यांच्यासोबत एनएसए हमदुल्लाह मोहीब यांच्यासह इतर नेत्यांनीही देश सोडला आहे. हे सर्व नेते शेजारीच्या ताजिकिस्तानमध्ये आश्रयाला गेले आहेत, असं सांगण्यात येतंय. अफगाणिस्तानात संघर्ष सुरु असताना तिकडे अमेरिकेत राजकीय वाद सुरु झाला आहे.

अफगाणिस्तानातील अमेरिकेचे सैन्य हटवल्याने हा वाद उफाळल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष जो बायडन यांना जबाबदार धरत, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

अफगाणिस्तानातून पळाल्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिलं आहे. देशातील रक्तपात रोखण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं असं अशरफ गनी म्हणाले.

तिकडे अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करजई यांनी व्हिडीओ पोस्ट करुन, आपल्या समर्थकांना काबूलमध्येच राहण्याचं आवाहन केलं आहे. अमेरिकेच्या सैन्य मोहिमेनंतर 2001 मध्ये करजई हे अफगाणिस्तानचे अध्यक्ष बनले होते. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सर्व व्यावसायिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

इथून केवळ सैन्याच्या विमानांनाच परवानगी देण्यात आली आहे. तालिबानने यापूर्वीच दावा केला आहे की काबूलमध्ये राष्ट्रपती भवनचा ताबा आपण घेतला आहे. यानंतर काही तासांनी अल जजीराने एक व्हिडीओ जारी करुन तालिबानी सैन्य राष्ट्रपती भवनात असल्याचं म्हटलं होतं. अमेरिकेने आपलं अफगाणिस्तानातील दुतावास काबूल विमानतळावर हलवलं आहे.

दुतावासावरील झेंडाही उतरुन एअरपोर्टकडे नेण्यात आला अफगाणिस्तानचे कार्यवाद गृहमंत्री अब्दुल सत्तार मीरजकवाल यांनी सांगितल्यानुसार, सत्तेचं हस्तांतरण शांततेत होईल. काबूलवर कोणताही हल्ला होणार नाही. तालिबानचा राजनैतिक कार्यालयाचा प्रमुख मुल्ला अब्दुल गनी बरादर हा काबुलमध्ये दाखल झाला आहे.

तालिबानकडे शांततेत सत्ता हस्तांतर करण्यास तयार असल्याचं अफगाणस सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. यामुळे अब्दुल गनी बरादर हा तालिबानचा नवा राष्ट्रपती बनू शकतो. अफगाणिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री अली अहमद जिलाली यांना अंतरिम प्रशासनाचे प्रमुख बनवले जाऊ शकते, असंही बोललं जातंय.

अहमदनगर लाईव्ह 24