अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-जर बाळ बोठे ९ एप्रिल पर्यंत स्वत:हून कोर्टात हजर झाला नाही तर त्याची मालमत्तर जप्त करण्याची कारवाई पोलिस करणार आहेत.
न्या. उमा बोऱ्हाडे यांनी हा आदेश दिला. दरम्यान न्यायालयाने दि.९ एप्रिल पर्यंत त्याला स्वत:हून न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले आहे.
अखेर यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने गुरुवारी फरार घोषित केले आहे.
पारनेर न्यायालयाने त्याच्याविरूध्द स्टॅंडिंग वॉरंट काढल्यानंतर देखील ही बोठे मिळून आला नाही. त्यामुळे त्याला फरार घोषित करण्याच्या मागणीसाठी या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा पोलीस उप अधीक्षक अजित पाटील यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
दि.१ मार्च रोजी दाखल केलेल्या या अर्जासंदर्भात न्या. बोऱ्हाडे यांच्या न्यायालयासमोर बुधवारी (३ मार्च) सुनावणी झाली. त्यानंतर अंतिम आदेश न्यायालयाने गुरुवारी दिला.
नगर-पुणे महामार्गावर जातेगाव घाटात ३० नोव्हेंबर रोजी जरे यांची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाची बोठे यानेच सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले होते.
घटनेनंतर मात्र बोठे पसार झाला. सर्वत्र शोध घेऊनही बोठे सापडत नसल्याने पोलिसांनी आता कायदेशीर मार्गाने त्याच्या मुसक्या आवळण्याची तयारी सुरू केली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार बोठे हा ९ एप्रिलपर्यंत स्वत:हून पोलिसात हजर झाला नाही तर त्याच्या मालमत्तेवर टाच येणार आहे.
दरम्यान जरे हत्याकांड प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींविरुध्द दि.२६ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी पारनेर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दखल केले आहे.