अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- मैत्री. या दोन शब्दातच मोठी ताकद आहे. प्रेम, आपुलकी, त्याग, समर्पण यांसारख्या अनेक गोष्टींचे मिश्रण म्हणजे मैत्री. मैत्रीचे विश्व खोल, व्यापक आणि अफाट असते.
आपण आपल्या मनातील कोणतीही भावना हक्काने सांगावी, अधिकारवाणीने सल्ला द्यावा, रागवावे, रुसावे, हुज्जत घालावी, हाणामारी करावी, जीवापाड प्रेम करावे, अशी एक व्यक्ती म्हणजे मित्र, असे ढोबळमानाने म्हणता येऊ शकेल. मैत्री कुणाचीही कोणाशीही असू शकते. मैत्रीला कोणतीही बंधने नसतात. वयाची मर्यादा नसते. जगभरात ज्या काही मोजक्या विषयांवर लिहिण्यासाठी, बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतील, त्यातील आघाडीचा विषय म्हणजे मैत्री.
आयुष्यात मित्र नसतील, तर जीवन व्यर्थ आहे, असे म्हटले जाते. चिमुकल्या वयात असल्यापासून ते अगदी देह सरणावर जाईपर्यंत मित्रत्व टिकवलेली अनेक उदाहरणे आपणास पाहायला मिळतात. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मैत्र बदलत जात असते.
आयुष्यामध्ये भरपूर नाती आहेत काही नाती जन्मताच असतात तर काही नाती जोडली जातात मानली जातात पण त्या सर्व नात्यांपैकी मैत्री हे नात सगळ्यात ग्रेट असत.एक मित्रच असतो ज्याच्या समोर आपण आपल्या मनातलं सर्वकाही स्पष्टपणे बोलतो, आपल दु:ख वेदना सर्वकाही त्याच्यासोबत शेअर करतो.
आपल्या आयुष्यामध्ये एखाद संकट आल की आपले खरे मित्रच संकटकाळी धावून येतात. मैत्री ही श्रीकृष्ण आणि सुदामा सारखी असावी कधीही न तुटणारी आणि कोणत्याही परिस्थिती मध्ये कधीही न विसरणारी.