अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- आजवर आपण विविध आंदोलने आपण पहिले आहेत.मात्र पाथर्डी तालुक्यात स्वतःला कोंडून घेऊन एक आगळं वेगळं आंदोलन केले. कारण होते रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे.
याबाबत सविस्तर असे की, पाथर्डी शहरातून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयात नगरसेवक बंडू पाटील बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली गटनेते चाॅद मणियार, मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर,
राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे, यांनी दुपारी दोनच्या सुमारास राष्ट्रीय कार्यालयामध्ये गेले असता, त्या ठिकाणी एकही अधिकारी उपस्थित नसल्याचे पाहून त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिपायाला कार्यालयाबाहेर काढून स्वतःला कार्यालयात बंद करून घेतले.
गेल्या चार वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी चालू तर कधी बंद अशा अवस्थेत आहे. सुमारे एक वर्षापूर्वी या राष्ट्रीय महामार्गाचे ठेकेदार बदलण्यात आले होते तेव्हापासून पाथर्डी शहरामध्ये मारुती मंदिर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रस्ता खोदून ठेवल्यामुळे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरीदेखील अद्याप पर्यंत याबाबत कोणीही गांभीर्याने घेतलं नाही.
हा राष्ट्रीय महामार्ग नसून हा मृत्यू मार्ग आहे का काय असा संतप्त सवाल उपस्थित केला जात असून. गेल्या चार वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरू व्हावे यासाठी आज पर्यंत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सुमारे १०० च्या आसपास आंदोलने केली आहेत, तरीदेखील या राष्ट्रीय महामार्ग चा प्रश्न अद्याप पर्यंत कायम आहे.
जोपर्यंत या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नाही तोपर्यंत आम्ही कार्यालयातून बाहेर येणार नाहीत असा पावित्र आंदोलकांनी घेतल्यामुळे प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला होता.
सायंकाळी शाखा अभियंता यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली मात्र महामार्गाचे काम सुरू झाल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही असा पवित्रा बंडू बोरुडे व कार्यकर्त्यांनी घेतला होता.