अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लादताच परत एकदा लॉकडाऊन झाले तर आता काय करायचे, या भीतीने नागरिकांनी हात आखडता घेतला आहे.
यामुळे सर्वत्र व्यवहार थंडावले असून गेल्या वर्षाप्रमाणेच मार्चच्या शेवटी कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांना परत एकदा आर्थिक संकटास तोंड देण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे संकट आले.
हळुहळु ते गडद होऊ लागल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने टप्याटप्याने लॉकडाऊन जाहीर करत जसे रुग्णसंख्या वाढत गेली तसा लॉकडाऊन वाढविला. सुमारे आठ महिन्यांचा कालावधी लॉकडाऊनमध्येच गेला.
गतवर्षी प्रथमच अशी परीस्थिती आल्याने सहानभुतीची लाट होती. अनेक सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांनी मदतीचा हात पुढे केला. मात्र वर्षभरात ही परीस्थिती आता बदलली आहे. कोरोनाचे संकट नोव्हेंबरमध्ये कमी झाले.
डिसेंबर, जानेवारी या महिन्यात पुन्हा परिस्थिती पूर्व पदावर येऊ लागल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद असताना जणु पुन्हा त्यास दृष्ट लागली. ग्रामपंचायत निवडणुका, लग्न समारभांत गर्दी झाली.
मास्कचा वापर केला गेला नाही अन् पुन्हा कोरोनाचे संकट आता उभे राहीले आहे. रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत असल्याने चिंतेचा विषय बनला असुन शासनाने आता पुन्हा कडक निर्बंध लाधले आहे.
आपल्या शेजारील पुणे, औरंगाबाद, नाशिक, विदर्भातील काही जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहेत.
त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होते की काय, याची भीती नागरिकांत असल्याने आतापासुनच नागरिकांनी हात आखडता घेतला असुन थोडीफार असलेली पुंजी काटकसरीने वापरताना दिसु लागली आहे.