अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-चोरीच्या वाढत्या घटनांनी पठारावरील सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेला असताना आता चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे.
गेल्या चार दिवसांतील विविध घटनांनी चर्चेत आलेल्या घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जवळेबाळेश्वरच्या मंदिरालगत असलेली जिल्हा पोलिस दलाची बिनतारी संपर्क यंत्रणाच आज पहाटे चोरट्यांनी चोरून नेली. बाळेश्वराच्या उंच टेकडीवर ही यंत्रणा बसवण्यात आली होती.
त्या माध्यामातून संगमनेर, घारगाव, संगमनेर तालुका, अकोले व राजुर पोलीस ठाण्यांंसह पुणे जिल्ह्याच्या सीमाभागातील पोलीस ठाण्यांंशी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचा विनाअडथळा संवाद होत होता. या चोरीच्या घटनेमुळे मात्र ही यंत्रणा प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे.
याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार, आज पहाटे अडीच ते सकाळी सात वाजेच्यादरम्यान संगमनेर तालुक्यातील बाळेश्वर मंदिर परिसरात घडली. याठिकाणी जिल्हा पोलीस विभागाने उंचावर असलेल्या घारगाव, अकोले, राजुर व पुणे जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील पोलिस ठाण्यांशी विनाअडथळा संवाद सुरु राहावा यासाठी बिनतारी यंत्रणा बसविलेली आहे.
विशेष म्हणजे या यंत्रणेच्या सुरक्षेसाठी रक्षकही तैनात केलेला असतो. तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले आहेत. असे असतानाही चौघा चोरट्यांनी आज पहाटेच्या सुमारास या सर्व कॅमेर्यांची मोडतोड करून, बिनतारी यंत्रणेच्या कंट्रोल कक्षात प्रवेश केला व त्या ठिकाणी असलेल्या बिनतारी यंत्रणेचे दोन रिपीटर,
तीन चार्जर, इंटरनेट राउटर, मायक्रोवेव्ह लिंक व अन्य साहित्य असे एकूण पावणे चार लाखांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. आज सकाळी ही बाब उघड झाल्यानंतर गडबडलेल्या घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
याबाबतची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आल्यानंतर तपासासाठी नगरहून श्वानपथक तर नाशिकहुन ठस तज्ज्ञांचेे पथकही आले होते. या घटनेने केवळ अहमदनगरच नव्हेतर संपूर्ण राज्यातील पोलिस दलात खळबळ उडाली आहे.