अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-काही महिन्यांपूर्वी राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून आला होता. मात्र फेब्रुवारीच्या शेवटाला जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
यामुळे पुन्हा एकदा नगरकरांवर कोरोनाचे ढग दाटू लागले आहे. गेल्या आठ दिवसांपासून नगर शहर आणि जिल्ह्यात करोनाचा संसर्ग नव्याने वाढत आहे.
शुक्रवारी विक्रमी 500 हून अधिक करोना बाधित समोर आल्यावर पुन्हा शनिवारी नव्याने 452 रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, नगर शहरात करोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेने काही ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत.
यात बोल्हेगावमध्ये 3 ठिकाणाचा समावेश असून या ठिकाणी शनिवारी (दि.12) दुपारी 2 वाजल्यापासून ते 26 मार्चपर्यंत या परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, आस्थापने बंद ठवण्याचे आदेश महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिले आहे.
कंटेन्मेंट भागातील नागरिकांसाठी महत्वाचे :- बोल्हेगाव येथील मनोलिलानगर येथील डहाळे ज्वेलर्स ते भानुदास लोटके यांच्या घरापर्यंत हा मायक्रो कंटेनमेंट झोन असणार आहे.
या कालावधीमध्ये या सूक्ष्म कंटेनमेंटमधील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहतील. कंटेनमेंट झोनमधील अत्यावश्यक सेवेसाठी उपायुक्त यांच्या नेतृत्वाखाली पथक कार्यरत राहील.
कंटेनमेंटमधील आत्यावश्य सेवेसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येईल. रहदारीसाठी खुल्या असलेल्या मार्गावर येणाऱ्या-जाणाऱ्यांची तपासणी होईल.
कंटेनमेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तू या महापालिकेतर्फे पुरवल्या जातील. त्यासाठी यंत्रणा उभी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.