राज्यात कशी असणार पावसाची परिस्थिती ? जाणून घ्या सविस्तर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- मुसळधार पावसामुळे संपूर्ण कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, येथील स्थिती पूर्वपदावर येत असताना आता भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेकडून 2 ऑगस्टपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा पुढील चार दिवसांसाठी राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला असून यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. ठाण्यात आज तर मुंबईतील काही भागांत उद्यापासून अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे आणि सातारा जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उद्या कोल्हापुरात अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) राज्यात पुन्हा अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निर्माण होणार असल्याचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी कृष्णानंद होशाळीकर यांनीही गुरुवारी यासंदर्भात ट्विट केले. गुरुवारपासूनच कोकणासह नगर, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, बीड, परभणी, लातूर आणि धाराशीव आदी जिह्यांमध्ये मुसळधार पावसाने धुमशान घालण्यास सुरुवात केली आहे.

2 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर आणखी वाढून अतिवृष्टी होईल. त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी, असे आवाहन करीत हवामान खात्याने काही जिह्यांना येलो अॅलर्ट आणि काही जिह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24