तहसीलदार ज्योती देवरेंचे आता काय होणार ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरुध्द राहुल झावरे, संदीप चौधरी, ज्ञानेश्वर लंके व सुहास सालके या नगर जिल्ह्यातील नागरिकांनी महाराष्ट्र लोकायुक्त यांच्या समक्ष भ्रष्टाचाराचे आरोप करणारी याचिका दाखल केलेली आहे.

काही दिवसांपूर्वी स्वतःची एक ध्वनिफीत व्हायरल करून कामाच्या ठिकाणी येणारे दबाव सहन होत नसल्याने आत्महत्या करण्याचे विचार येतात असे जाहीर केल्याने तहसीलदार ज्योती देवरे महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाल्या होत्या. स्वतः केलेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी व सहानुभूती निर्माण करण्याच्या उद्देशाने ज्योती देवरे यांनी या ध्वनिफीतीचा वापर केला असा आरोप तक्रारदार झावरे यांनी केला आहे.

महाराष्ट्राच्या लोकायुक्त पदावर नुकतीच जस्टीस विद्याधर कानडे यांची नियुक्ती झाल्यानंतर दाखल झालेले हे पहिलेच प्रकरण ठरले आहे. अनेक वर्षे लोकायुक्त नसल्याने काहीच कामकाज नसलेल्या लोकायुक्त व उपलोकायुक्त यांच्या न्यायालयाकडे पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रार याचिकेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे लक्ष केंद्रीत झाले असून ज्योती देवरेंचे आता काय होणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

स्वतःच्या पदाचा गैरवापर करून व्यक्तिगत हितासाठी, भ्रष्ट हेतूने अनेक पातळ्यांवर भ्रष्टाचार करणे, वाळूमाफियांना परस्पर कारवाईमुक्त करणे, बेकायदेशीर वाळू उपसा करनाऱ्याचे ट्रॅक्टर, डम्पर, जेसीबी मशीन्स व पोकलेन अशी वाहने कोणतीही तडजोड शुल्क सरकारला जमा न करता परस्पर मुक्त करणे अशा अनेक प्रकरणात ज्योती देवरे यांनी तब्बल ५ कोटी ९४ लाख ९६ हजार ०७२ रुपयांच्यावर घोटाळा केला आहे,

असा आरोप लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीतून झावरे, चौधरी, लंके व सालके यांनी केला आहे. ही तक्रार याचिका ॲड. असीम सरोदे, ॲड. अजित देशपांडे व ॲड. अक्षय देसाई यांच्या मदतीने लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कार्यालय मुंबई यांच्याकडे सोमवारी ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्यात आली.

ज्योती देवरे यांनी भ्रष्टाचार केल्याचे अनेक पुरावे याचिके सोबत दाखल करताना तक्रारदरांनी ६ ऑगस्ट २०२१ रोजी संयुक्त चौकशी समितीत विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे दाखल झालेल्या अहवालाचा आधार घेतला आहे. अप्पर तहसीलदार धुळे यांच्या विरोधात किशोर मोहनलाल बाफना यांनी दाखल केलेल्या अपीलशी संबंधित दस्तऐवज महत्त्वाचा आहे.

त्यातून स्पष्टपणे दिसते की ज्योती देवरे जेव्हा धुळे येथे अप्पर तहसीलदार म्हणून काम करत होत्या तेव्हा त्यांनी नगरपालिकेच्या ४८.६५ एकर जागेबाबत १००० कोटींचा भ्रष्टाचार केला. धुळ्याच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या निष्कर्षाच्या पहिल्या मुद्द्यामध्ये नमूद केले आहे

की धुळे शहरात सर्वेक्षण क्र. ५०१ आणि ५१०, ‘उदयनमुख सामुदाहिक शेत’ सोसायटीच्या सदस्यांना शेतजमिनीचे वाटप करण्यात आले. त्यात असे आढळून आले की ४८.६५ एकर जमीनीची जमीन प्रत्यक्षात बेबंद सरकारी जमीन (सरकारपडीत) असे शीर्षक देण्यात आले होते परंतु तरीही तेव्हा धुळ्याच्या तहसीलदार म्हणून ज्योती देवरे यांनी ०३/१०/२०१७ रोजी आदेश देऊन सोसायटी सदस्यांना बेकायदेशीरपणे जमीन मंजूर केली.

अहमदनगर लाईव्ह 24