अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- काही दिवसापासून राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढत असून, गेल्या आठ दिवसापासून वाढती आकडेवारी पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक विभागाला सूचना केल्या आहेत.
आज एकीकडे संपूर्ण जिल्हा कोरोनाचा सामना करत असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वळण येथे एका भलत्याच आजाराने डोकं वर काढले आहे.
वळण येथे जीवघेण्या डेंग्यूच्या आजाराचे झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. विशेषतः लहान मुले मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या आजाराने ग्रस्त आहेत. थंडी-ताप-उलट्या, पांढऱ्या पेशी कमी होणे अशा रुग्णांची संख्या वाढली आहे.
वळण परिसरात साथीच्या आजाराने थैमान घातल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. शासनाच्या आरोग्य यंत्रणेने डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरू करावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.