अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- साधारणत: २/३ वर्षापूर्वी एक भिखारी घोटवी ता. श्रीगोंदा येथील शेतकरी शंकरकाका बारगुजे यांच्या पाण्याच्या टाकीवर पाणी पिण्यास थांबला, आणि तेथेच बसून राहिला त्यांचा मुलगा निलेश याने त्याच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला परंतु तो काय बोलतोय हे काहीच कळत नव्हते.
त्याच्या अवस्थेवरून तो भुकेला आहे हे जाणवत होते. त्यांनी त्याला जेवण दिले, त्यांच्या या वागण्याने त्याची भीती थोडीशी कमी झाली आणि बारगुजे कुटुंबाविषयी त्याला विश्र्वास निर्माण झाला आणि तो जवळ जवळ तीन वर्ष त्यांच्या घरीच राहिला.
या कालावधीत निलेश ची त्याच्याशी मैत्री झाली. व त्याच्याविषयी मनात आपुलकी निर्माण झाली. निलेश चा भाऊ शेती उद्योजक महेशशेठ बारगुजे याची मात्र या पाहुण्याला त्याच्या घरी कसे सोडवता येईल हि तळमळ चालू होती.
या आगंतुक पाहुण्याला त्याच्या घरी कुटुंबात पोहचवणे हे आपले कर्तव्य आहे आणि आपण काहीही करून ते साध्य करू असे त्याला मनोमन वाटत होते. मात्र भाषा हि मोठी अडचण व दुसरी म्हणजे तो मानसिक दृष्ट्या अवघड स्थितीत होता. एकदा तर तो इतका बेभान झाला कि महेश ला त्याच्या हातून प्रसाद खावा लागला.
तरी त्या परिस्थितीत ही आपला निश्चय न ढळू देता त्याने या पाहुण्याला त्याच्या घरी पोहोचवायचेच हा चंग बांधला. काही दिवस गेल्यानंतर तो तरुण त्याचे नाव आणि गावाचे नाव इंग्रजी भाषेत लिहून दाखवू लागला त्याचे नाव के पलानी मुरुगन आणि गावाचे नाव
तामिळनाडू राज्यातील मुक्कुडी परंतु तिथे जायचं कस हा सांगतोय ते खर आहे का हे कळत नव्हत. मग बाबासाहेब बारगुजे व त्यांचे बंधू बाळासाहेब बारगुजे यांना अचानक त्यांचा बंगलोर मधील त्यांचा व्यापारी मित्र एन शेखर याची आठवण झाली.
तो मुळचा तामिळनाडूचा मग फोन वरून त्यांनी या दोघांचे बोलणे करून दिले त्याच्याशी बोलल्यानंतर त्या व्यापारी मित्राने त्या तरुणाचे गाव मदुराई पासून ३५ किमी वर एक छोटेसे खेडेगाव असल्याचे सांगितले.
अन प्रवास चालू झाला त्या तरुणाला त्याच्या घरी पोहचवण्याचा. महेश बारगुजे यांनी स्वतःची गाडी घेतली, त्याच्या बरोबर वैभव बारगुजे, निलेश बारगुजे, दिपक बारगुजे व अनिल निंभोरे हे सर्व निघाले..
भाषेची अडचण असल्यामुळे हे सर्वजण पहिल्यांदा त्या व्यापारी मित्राकडे गेले त्यानेही मदत करत यांच्या सोबत दुभाषा म्हणून एक हमाल पाठवला आणि अखेर तीन दिवसांच्या प्रवासानंतर हे सर्व तरून तामिळनाडू राज्यातील मुक्कुडी या के पलानी मुरगन याच्या गावी पोहोचले.
महेश सोबत गेलेल्या त्या हमालाने तेथील सरपंचाना त्या मुलाविषयी सांगितले असता सरपंचाचे उत्तर ऐकून यांच्या पायाखालची जमीनच सरकली. सरपंचाने सांगितले कि त्या नावाच्या तरुणाचा १०- १२ वर्षांपुर्वीच बेपत्ता झाला आहे व एक दोन वर्ष शोधाशोध केल्यानंतर त्याच्या घरच्यांनी हि तो मृत्यू पावला असे समजून त्याचे नंतरचे सर्व विधी पार पाडले होते.
यालाही आपले घर कुठे आहे काही आठवत नव्हते. शेवटी गावात एका घरासमोर गेल्यानंतर त्याच्या आईने त्याला ओळखले आणि ज्याला मृत समजत होतो तो पोटचा मुलगा समोर पाहून आईने एकच हंबरडा फोडला.
हे दृश्य पाहण्यासाठी संपूर्ण मुक्कुडी गाव जमा झाले होते. त्या गावासाठी हे सर्वजण देवदूत होते. सर्वजण भरल्या डोळ्यांनी हात जोडून या तरुणांचे आभार मानत होते. हे सर्व पाहून हे तरुणही भारावून गेले तेथील लोकांनी वर्गणी करून महेश व त्याच्या मित्रांना खर्च देवू केला पण त्यांनी तो नम्रपणे नाकारून आजही या मराठी मातीत श्री छत्रपती शिवाजी राजांचे संस्कार,
आचार व विचार जिवंत आहेत हे आपल्या कृतीतून दाखवून दिले. आणि तामिळनाडू मध्ये देखील मराठी माणसावर स्तुतिसुमने उधळली गेली. श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी या छोट्याशा खेडेगावातील तरूणांची अज्ञात व्यक्तिला वाचवण्यासाठीची धडपड माणुसकी अजूनही जिवंत आहे हेच सर्वांना दाखवते त्यांचे हे कार्य निश्चितच सर्वांना प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे.
या तरुणांनाच्या घरच्यांशी बोलले असता त्यांचे कुटुंबीय बाबासाहेब बारगुजे, बाळासाहेब बारगुजे, एकनाथ बारगुजे यांनी आम्ही केलेल्या संस्काराचे आज चीज झाले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.