अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- कोव्हीड रुग्णांच्या जिल्ह्यातील वाढत्या संख्येला आणि मृत्यूला केवळ प्रशासनाचा हलगर्जीपणाच कारणीभूत असून, जिल्हा संकटात असताना पालकमंत्रीसुध्दा पाहुण्यासारखे येतात.
जिल्ह्यातील तीन मंत्री करतात काय? असा सवाल भाजपाचे जेष्ठनेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. नगरमध्ये काल एकाच दिवशी मोठ्या संख्येने झालेल्या अंत्यविधीच्या दुर्दैवी घटनेवर भाष्य करताना आ.विखे पाटील म्हणाले की,
जिल्ह्यावर अशी वेळ यावी हे अतिशय वेदनादायी आहे. मागील काही दिवसात प्रशासन फक्त ब्रेक दी चेन मध्ये गुंतले आहे. यातून कोव्हीड रुग्णांची संख्या आटोक्यात आली का?
उपचारांसाठी रुग्ण वणवण भटकत आहेत, बेड्सची उपलब्धता नाही, रेमडीसीविर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात झाला आहे.
या संदर्भात प्रशासनाला विचारणा केली तर आम्ही सुचना दिल्या आहेत येवढेच उत्तर मिळते. मग नेमक्या सुचना केल्या कुणाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्ह्यातील तीन मंत्री सरकारमध्ये आहेत, परंतू एकानेही कोव्हीड रुग्णालय उभे केले नाही.
त्यामुळेच सामान्य रुग्णालयांच्या भरवशावरच राहावे लागत आहे. पालकमंत्रीही केवळ पाहुण्यासारखे येतात आणि जातात असा खोचक टोला लगावून आ.विखे पाटील म्हणाले की, मंत्र्यांना सध्या फक्त केंद्र सरकारवर टिका करण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
केंद्राकडे बोट दाखविण्यापेक्षा रेमडीसिविर आणि ऑक्सीजनची उपलब्धता करा, प्रत्येक मंत्र्याला आपल्या मतदार संघात, जिल्ह्यात २०० बेडचे कोव्हीड रुग्णालय उभारायला सांगा, केवळ फेसबुकवर संवाद साधुन जनतेचे समाधान तुम्ही करु शकणार नाही असा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
केंद्र सरकारने राज्याला मोठ्या प्रमाणात व्हॅक्सीनचा पुरवठा केला. पण त्याचे नियोजन राज्य सरकार व्यवस्थित करु शकले नाही.
केवळ आपले अपयश झाकण्यासाठी आणि जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी व्हॅक्सीनच्या विषयाला राजकीय वळन देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडुन होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.