अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये याच मुद्द्यावरून आरोप – प्रत्यारोप सुरूच असतात.
यातच भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर आपल्या शब्दात टीका केली आहे. सरकारची व्यवस्था जेव्हा अपयशी ठरते तेव्हा समाजातील तरुण धैर्याने पुढे येऊन सामान्य माणसाला आधार देण्याचे काम करतात, हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे आ. विखे पाटील म्हणाले.
संगमनेर तालुक्यातील निमोण येथील पुष्पगंध सेवाभावी संस्था आणि ग्रामपंचायतीच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन आमदार विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले कि, देशात कोरोना संकटाची तिसरी लाट येण्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
आताच रुग्णांना बेड मिळत नाही, इंजेक्शन जादा दराने खरेदी करण्याची वेळ आली. सरकारची कोणतीच व्यवस्था नसल्याने सामान्य माणसाला खासगी रुग्णालयांचा आश्रय घ्यावा लागल्याने अर्थिक संकट मोठे उभे राहिल्याचे आ. विखे पाटील म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी कारभारामुळेच जनतेवर आता ‘माझा जीव माझीच जबाबदारी’ असे म्हणण्याची वेळ आली असल्याची टीका भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
जनतेला सल्ले देण्यापेक्षा ‘प्रवरे’ प्रमाणे व्यवस्था उभी केली असती तरी कोव्हिड संकटात जनतेला दिलासा मिळाला असता, असा टोलाही त्यांनी लगावला.