अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाने मुक्काम ठोकला असून, पुढील चार दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने मध्य भारतासह दक्षिणेतील बहुतांश राज्ये, पश्चिम किनारपट्टीवर सध्या जोरदार पाऊस सुरु झाला आहे.

पुढील ४ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात जोरदार पावसाचा शक्यता आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांसह पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ७ व ८ सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या २४ तासात कोकण, गोवा व मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आधी छत्तीसगढवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला होता.

त्यानंतर आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम राज्यातील हवामानवर दिसून येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात आजपासून ते 9 सप्टेंबरपर्यंत अतिमुसळधार पाऊस होणार आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी ट्वीट करून पुढील चार दिवसांच्या हवामानाबद्दलची माहिती दिली आहे.