अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- दिवाळीची सुट्टी संपवून आता कालपासून जिल्ह्यातील अनेक शाळा महाविद्यालये सुरु झाली असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
तो म्हणजे शाळेत जाण्यासाठी हक्काची एसटी बस ( लालपरी ) कर्मचारी आंदोलनामुळे बंद असल्याने शाळेत जायचे कसे ? एकीकडे कोरोनानंतर प्रथमच तब्बल दिड वर्षानंतर शासनाने शाळा सुरु करण्याचे आदेश दिले.
परंतु दुसरीकडे एसटी बस कर्मचाऱ्यांचा गेल्या अठरा ते वीस दिवसापासून संप सुरु आहे. त्यामुळे राज्यातील सर्व एसटी बस बंद आहेत.
ग्रामीण भागातील जवळपास पन्नास टक्के विद्यार्थी शाळा – काँलेजला महाविद्यालयात जिल्हाच्या तालुक्याच्या ठिकाणी तसेच ग्रामीण भागातील विद्यालयात एसटी बसनेच जातात.
आतापर्यंत एसटी बस नियोजित वेळेनुसार आली नाही. बसथांब्यावर थांबली नाही किंवा वेळेपुर्वी निघून गेली तर विद्यार्थी संप करत होती .
मात्र आता बसच बंद असल्याने शाळेत कसे जायचे असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यांपुढे उभा राहत आहेत. विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने शाळेत जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होईल.
तो खर्च परवडणारा नसुन तो टाळण्यासाठी शासनाने लवकरात लवकर संपावर तोडगा काढावा जेणेकरून विद्यार्थ्याचे होणारे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होणार नाही.अशी अपेक्षा सर्वसामान्य करत आहेत.