राज्य सरकारचा ‘तो’ धनादेश आणि लस कुठे गेली..? आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- राज्यात आम्ही एका धनादेशावर लस खरेदी करू, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती; पण राज्य सरकारचा धनादेश आणि लस कुठे गेली, हे शोधण्याची वेळ आता आली आहे. अशी टीका माजी मंत्री व भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

आदिवासी बांधवांना खावटी कर्ज योजनेतून मंजूर झालेल्या किटचे वितरण आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारने देशातील ८१ कोटी लोकांना मोफत धान्याची उपलब्धता करुन दिली.

कोविडसारख्या भीषण संकटाला देश सामोरा जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सामान्य माणसांच्या हिताचे निर्णय केले. आज ४५ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण करणारा भारत देश जगात अग्रेसर ठरला आहे. लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतुद केंद्र सरकारने केली आहे.

पंतप्रधानांनी मोफत लस उपलब्ध करून दिल्याने राज्य सरकारचे मोठ्या प्रमाणात पैसे वाचले आहे, त्यांनी आता हे पैसे सामान्यांसाठी खर्च करावेत. मागील दोन वर्षात सामान्य माणसाला राज्य सरकारचा कोणताही आधार मिळालेला नाही.

याउलट केंद्र सरकराने १४ हजार कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद करुन खतांचे भाव स्थिर ठेवले. वैद्यकीय शिक्षणासाठी ओबीसींकरीता २७ टक्के आणि अर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सामान्य विद्यार्थ्यांना आता वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24