Ahmednagar News : मागील आठवड्यात अकोले तालुक्यातील कातळापूर येथे एका २५ वर्षे महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या पायातील पैंजण व पर्समधील सॅनिटरी पॅडवरून पोलिसांनी महिलेचा शोध घेतला व आरोपींना बेड्याही ठोकल्या.
कल्याणी महेश जाधव (रा. वांबोरी, तालुका राहुरी) असे महिलेचे नाव आहे, तर आरोपी महेश महेंद्र जाधव हा महिलेचा पती असून त्याचा भाचा सूत्रधार मयूर अशोक साळवे (रा. राहुरी) असल्याचे तपासातून पुढे आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या असून अनैतिक संबंधाच्या संशयावरून हा गुन्हा कबुली त्यांनी दिली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की महेश जाधव हा त्याची पत्नी कल्याणी हिच्यावर नेहमी संशय घेत होता. त्यामुळे दोघा नवरा बायकोमध्ये कायम वाद होत होते. यावर कायमचा उपाय काढण्यासाठी आपला भाचा मयूर याच्या बरोबर त्याने सल्लामसलत केली.
दोघांनी मिळून कल्याणीचा कायमचा काटा काढायचे ठरवले. पूर्व नियोजनानुसार दोघांनी कल्याणीला फिरायला जायचे आहे असे सांगितले. सकाळी ते वांबोरी येथून निघाले. ते अकोले तालुक्यातील कातळापूर येथे थांबले.
विरळ लोक वस्ती असल्यामुळे त्यांनी ही जागा निवडली. यावेळी महेश लघुशंकेला जाऊन येतो,तोपर्यंत तुम्ही येथे थांबा, असे म्हणून बाजूला गेला. त्यानंतर महेशने खिशातून दोर काढत मागील बाजूने येत कल्याणीचा गळा आवडला.
त्यानंतर मयूरनेही त्याला मदत केली. त्यांचे काम फत्ते झाल्यानंतर त्यांनी तिच्या पर्समधील आधार कार्ड व इतर कागदपत्रे काढून घेतली; मात्र तेथे पायातील पैंजण व सॅनिटरी पॅड याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आणि त्यावरूनच पोलिसांनी गुन्हा उघड केला.
या सॅनिटरी पॅडवर फॉर यूज ओन्ली जिल्हा परिषद अहमदनगर असे लिहिलेले होते व ते फक्त मागासवर्गीय महिलांकरिताच होते. त्यामुळे पोलिसांनी सोशल मीडियावर महिलेचा फोटो व्हायरल केला, महिला मागासवर्गीय असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला.
अकोले तालुक्यातील गावागावात चौकशी करूनही महिलेची ओळख पटत नव्हती. शेवटी एलसीबीची टीम येथील कार्यालयात गेली. त्यांनी पेंडबाबत माहिती घेतली. त्यानंतर आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या ग्रुपवर पोलिसांचे मेसेज व महिलेचा फोटो पाठविण्यात आला.
त्यानंतर वांबोरी येथून एक फोन आला व ही महिला कल्याणी जाधव असल्याचे समजले. कल्याणीचा पती महेश यास फोटो दाखवण्यात आला तर त्याने ही माझी पत्नी नसल्याचे सांगितले; मात्र सोनई पोलीस ठाण्यामध्ये चौकशी केली असता कल्याणी जाधव मिसिंग असल्याची केस तेथे दाखल होती.
त्यामुळे पोलिसांना महेश जाधव याचा संशय आला. अधिक चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी आपला खाक्या दाखविला तेव्हा मामा-भाच्याने घटना कशी घडली,याची सविस्तर माहिती पोलिसांना दिली.
घटना उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत आरोपींच्या मुसक्या आवळल्या त्याबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.