अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील माहेर वासीण असलेल्या व पारनेर न्यू आर्टस् कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयात काम केलेले व सध्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे रामकृष्ण मोरे महाविद्यालय वनस्पतीशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक कल्पना सावंत या कोण होणार करोडपती या विशेष भागात दिसणार आहे.

सोमवार दि.६ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर या कालावधीत सोनी मराठी वाहिनीवर याचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर हे करत आहेत. सध्या सोनी मराठी वाहिनीवरील कोण होणार करोडपती या लोकप्रिय कार्यक्रमात उत्तुंग यशाची भरारी पारनेरच्या कल्पना सावंत या कन्येने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.

पारनेर हा कायम दुष्काळी भाग राहत आलेला आहे. अशा या तालुक्यातील विद्यार्थी कायम संघर्षमय जीवनाची वाटचाल करत अभ्यास करत आलेला आहे. अशा विद्यार्थ्यांपैकी कल्पना ही एक पिंपळनेर येथील हुशार विद्यार्थिनी.आई – वडील शेतकरी. घरची परिस्थितीही बेताचीच अशा वातावरणात कल्पनाने प्रचंड मेहनत घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले.

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्टस् कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर काही काळ तिने काम केले. नंतर याच महाविद्यालयात ती सध्या पीएच्.डीचे संशोधन करत आहे.

सध्या ती पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे रामकृष्ण मोरे महाविद्यालय,पुणे येथे वनस्पतिशास्त्र विषयाची सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. कल्पना सावंत हिने सोनी टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम कोण होणार करोडपती या कार्यक्रमामध्ये एक रोमहर्षक इतिहासच रचला आहे.

हा रोमहर्षक विजय ६ व ७ सप्टेबरला सोनी मराठी वाहिनीवर रात्री ९.०० वाजता आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. त्यांना लाभलेले गुरुजन, त्यांनी घेतलेले शिक्षण आणि आता सध्या पीएच्.डीसाठी संशोधन करत असताना सातत्याने करत असलेला अभ्यास,अवांतर वाचन ,चौकस आणि व्यापक समाजविषयक दृष्टीकोण या अशा ज्ञानाच्या जोरावर त्यांनी हा प्रवास सहज साकार केलेला आहे.