अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- जिल्हा बॅंकेच्या नव्या कारभाऱ्यांसाठी आज नव्या संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड होणार आहे.
जिल्हा बॅंकेचे नवे कारभारी कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच चालू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नेमके कोणाला पावणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक संचालक असल्याने राष्ट्रवादीचाच चेअरमन होईल, असा ठाम दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात असल्याने राष्ट्रवादीतील इच्छुकांनी जोरदाररित्या फिल्डिंग लावली आहे.
शेवगाव-पाथर्डीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले, श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष उदय शेळके, श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे हे इच्छुक असून, उपमुख्यमंत्री व महसूलमंत्री कोणाला पावणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.