अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :- जिल्ह्यातील विविध नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पोकलॅनसह इतर यंत्रांच्या साह्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात आहे.
हा वाळू उपसाचा तमाशा महसूल विभागाने तातडीने बंद करावा अन्यथा दहा दिवसात त्यांच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला आहे.
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता अवैध वाळू उपशामुळे जिल्ह्याचे व तालुक्याचे राजकारण नासले असल्याची टीका त्यांनी केली आहे. टाकळी ढोकेश्वर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खा. डॉ. विखे बोलत होते.
जिल्ह्यामध्ये वाळू तस्करीत मोठे अर्थकारण होत असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला 100 कोटी वसूल करण्याचा जो आरोप झाला आहे, तो फक्त एक ट्रेलर आहे.
शंभर कोटी रुपयांचा देशमुखांचा ट्रेलर तर भविष्यात या वाळू वसूली संदर्भात महसूल विभागाचा पिक्चर बाकी आहे, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले आहेत.
अवैध वाळू उपसाविरोधात महसूल विभागाने कारवाई न केल्यास त्याचे पडसाद विधानसभेसह लोकसभेत उमटतील, असा इशाराही खासदार विखे पाटील यांनी दिला आहे.
सध्या कोरोनाचे निर्बंध सर्वसामान्यांवर असून या वाळु व्यवसायावर कोरोनाचे कोणतेही निर्बंध नाहीत. यावर खासदार विखे पाटील यांनी टीका केली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आर्शिवाद घेवून या वाळू उपशाच्याविरोधात उपोषण करण्याचा निर्णय खासदार विखे यांनी घेतला आहे.
यासंबंधीचे सर्व सबळ पुरावे, व्हिडिओ शूटिंग, जीपीएस यंत्रणा आमच्याकडे असून याचे पुरावे जिल्हाधिकार्यांना दोन दिवसांत सादर करणार असल्याचे ते म्हणाले.