अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- पत्नीचे तिच्या गावातील इसमासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीकडून आपल्या पत्नीला मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
दरम्यान हि घटना नेवासा तालुक्यातील सोनई येथे घडली आहे. याप्रकरणी संबंधित पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सोनई येथे राहणारा बाळासाहेब त्रिंबक जंजाळ हा त्याची पत्नी कावेरी जंजाळ हिला गेल्या काही दिवसापासून अनैतिक संबंधाच्या संशयावरून मारहाण करत असत.
आपल्या पत्नीचे तिच्या माहेरच्या गावातील इसम संतोष वाघ याच्यासोबत अनैतिक संबंध आहे. या कारणावरून बाळासाहेब जंजाळ दारुच्या नशेत त्याची पत्नी कावेरीला वारंवार मारहाण करत होता.
याच कारणावरून आरोपी बाळासाहेब जंजाळने त्याची पत्नी कावेरीला लाकडी दांडक्याने जोरदार मारहाण केली आणि तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी बाळासाहेब जंजाळ हा घटनास्थळावरून फरार झाला.
या सर्व घटनेवरून कावेरी जंजाळ यांची बहीण सौ.लता अशोक कापसे यांनी सोनई पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी बाळासाहेब जंजाळ याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.