अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- माहेरी जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून नवऱ्याने बायकोला दगड व इतर हत्याराने ठार मारले. ही घटना राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे घडली.
अलका उर्फ आक्का वसंत शिंदे असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील गुंजाळे गावाच्या तलावाजवळ १६ ते १९ ऑगस्ट या कालावधीत घडलेली खूनाची ही घटना गुुरुवारी सकाळी उघड झाली.
या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर विभागाचे उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नंदकुमार दुधाळ,उपनिरीक्षक शंकर रजपुत, उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ, उपनिरीक्षक निरज बोकील,
फौजदार रविंद्र डावखर, हेड काॅन्सटेबल चंद्रकांत बऱ्हाटे, काॅन्स्टेबल वाल्मिक पारधी, काॅन्स्टेबल रोहित पालवे या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आरोपी वसंत लक्ष्मण शिंदे (५५, रा. गुंजाळे) यास गावापासून जवळ असलेल्या डोंगरातुन ताब्यात घेतले.
या घटनेत अलका उर्फ आक्का वसंत शिंदे वय ५५ ही महिला ठार झाली. या महिलेची मुलगी बाली काळू निकम हिने गुरुवारी राहुरी पोलिसात फिर्याद दिली आहे.
त्यात म्हटले आहे की, गुंजाळे शिवारातील तलावाजवळ झोपडीत माझ्या आई वडीलाचे वास्तव्य होते.आई श्रीगोंदे येथे माहेरी जाण्याचे म्हटल्याने वडिलांनी नकार दिला.
यावरून दोघांत भांडण होऊन आईला मारहाण करण्यात आल्याने तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर चौथ्या दिवशी वसंत शिंदे याने मुलीला भेटुन तुझी आई उठत नाही ही माहिती दिल्याने मुलगी घटनास्थळी दाखल झाली.
मात्र आईचा मृत्यू झाल्याचे दिसुन आले.खुनाच्या घटनेला चार दिवसाचा कालावधी उलटल्याने अलकाचा मृतदेह खराब झाला होता. मृतदेहाचे जागेवर शव विच्छेदन करून अलकाचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.