अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-जागतिक अर्थव्यवस्था सावरत असल्याने सोन्याची चमक फिकी पडली आहे. मागील नऊ महिन्यात सोन्याच्या दरात २१ टक्के घसरण झाली आहे.
शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सोन्याचा भाव ४३००० रुपयांसमीप आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या 13 दिवसांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 238 रुपयांची घट नोंदवली गेली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या दरातील घट अशीच सुरू राहील अशी अटकळ बांधण्यात येत आहे.
जाणकारांच्या अंदाजानुसार येत्या काळात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 42 हजार 500 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो. जानेवारी महिन्यापासून ते आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत 5870 रुपयांची घट झाली आहे.
सोन्याची किंमत सध्या त्याच्या सर्वाधिक किमतीपेक्षा 11 हजार 922 रुपयांनी खाली उतरली आहे. अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात 2.5 टक्क्यांची घट करण्यात आल्याच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरांत मोठी घट झाली.
भारतीय गुंतवणूकदार स्थानिक दरांमध्ये घट झाल्याचा फायदा उचलत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती कमी असल्याचा, रुपयाच्या विनिमय दरात वाढ आणि सीमाशुल्कात घट यामुळे स्थानिक बाजारातील कमी दराचा फायदा घेत गुंतवणूक करत आहेत.
कमी व्याजदरासह सध्याची वृहत आर्थिक परिस्थिती, मौद्रिक विस्तार आणि उच्च मुद्रास्फिती यामुळे गुंतवणूकदार पैसे रणनीतिक संपत्तीत लावत आहेत.
लसीकरणाने घेतलेला वेग आणि अर्थव्यवस्थेत झपाट्याने होत असलेली सुधारणा पाहता सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.