Maharashtra news:न्यायालयांत प्रलंबित खटल्यांची संख्या, त्याला मिळणाऱ्या तारखा आणि न्यायालयांच्या सुट्ट्या हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. कनिष्ठ न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत अशीच स्थिती आहे.
मात्र, याला गती देण्यासाठी न्यायालयाचे कामकाज सकाळी नऊ वाजल्यापासूनच सुरू करण्याचे संकेत मिळत आहेत.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय लळीत यांनी यासंबंधीचे संकेत दिले आहे.
लळीत यांच्याकडे भावी सरन्यायाधीश म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाला महत्व आहे. काल न्यायमूर्ती लळीत यांनी स्वत:च एक तास लवकर कामकाज सुरू केले होते. त्यानंतर न्यायालयात उशिरा आलेले ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्याशी संवाद साधताना न्या. लळीत यांनी एक विधान केले.
न्या. लळीत म्हणाले, ‘माझ्या मते खरे तर न्यायालयाचे कामकाज सकाळी नऊ वाजताच सुरू व्हायला हवे. मी नेहमीच सांगतो की, मुले जर सकाळी सात वाजता शाळेत पोहोचू शकतात, तर आपण सकाळी नऊ वाजता कामकाज का सुरू करू शकत नाही? सकाळी साडेनऊ हीच न्यायालये सुरू करण्याची अधिक योग्य वेळ आहे’, असेही मत त्यांनी मांडले.
‘न्यायालयांचे कामकाज लवकर सुरू झाल्यास ते लवकर संपू शकते आणि या परिस्थितीत न्यायमूर्तींना सायंकाळी आपल्यासमोरील दुसऱ्या दिवशीच्या खटल्यांचा अधिक अभ्यास करता येईल’ असे ते म्हणाले.
हा धागा पकडून वकील मुकुल रोहतगी म्हणाले, ‘न्यायालयीन कामकाजाची नवी रचना ऑगस्टअखेरपासून अधिकाधिक दिसू लागेल, अशी आशा आहे’, सध्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर न्यायमूर्ती लळीत सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेऊ शकतात.