अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत कुठल्याही धार्मिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयाेजनाला जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले यांनी बंदी घातली आहे. लग्न समारंभ 25 लाेकांच्या उपस्थित हाेईल, असेही आदेशात नमूद केले आहे.
लग्न समारंभ करताना मंगल कार्यालयाशी संबंधीत सर्व कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण झालेले पाहिजे. लसीकरण झालेले नसल्यास आरटीपीसीआर, अशी काेराेना चाचणी केली पाहिजे. ही चाचणी निगेटिव्ह असणे गरजेचे आहे.
तसे प्रमाणपत्र गरजेचे आहे. लसीकरण पूर्ण झालेले नसल्यास किंवा काेराेना चाचणीचे प्रमाणपत्र नसल्यास संबंधितांविराेधात दंडात्मक कारवाई हाेणार आहे. हा दंड एक हजार रुपये असू शकताे. याशिवाय आस्थापनांना दहा हजार रुपये दंड हाेणार आहे.
यानंतर संबंधित लग्न कार्यालयाकडून पुन्हा असे प्रकार घडल्यास संबंधित कार्यालय, आस्थापना सील केली जाईल. आदेशापर्यंत तिथे काेणतेही कार्यक्रम घेता येणार नाही. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विवाह आयाेजित केल्यास त्यांनाही हे आदेश लागू राहतील.
अत्यंविधीस जास्तीत जास्त 20 लाेकांची उपस्थित राहिल. स्मशान भूमीच्या ठिकाणी नेमणूकीस असलेल्या कर्मचाऱ्यांना लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे.
या कर्मचाऱ्यांकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र किंवा काेराेना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी अत्यंविधी करणायांना या अटी लागू राहतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी सांगितले आहे.