अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता,मात्र राज्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन १ जून रोजी संपत आहे. लॉकडाऊन पुन्हा वाढवला जाणार की उठवला जाणार यासंबंधी चर्चा सुरु आहे.
तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सध्या राज्य सरकारकडून तयारी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. दरम्यान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, रेड झोनमधील गावांना सध्या कोणताही धोका पत्करण्याची गरज नाही. त्या जिल्ह्यात जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या तालुक्यांमध्ये कडक निर्बंध करावेत आणि ज्या तालुक्यात रुग्ण नाही तिथे थोडी सवलत द्यावी.
तसंच बाकीच्या जिल्ह्यात मात्र टप्प्याटप्य्याने लॉकडाऊन कमी करावा आणि शिथीलता द्यावी असा विचार असून त्यादृष्टीने पाऊल टाकत आहोत. “राज्यात ३१ तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे. राज्यातील १५ जिल्हे असे आहेत जिथे पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
काही जिल्ह्यात तीन ते पाच टक्के प्रमाण आहे. सरसकट लॉकडाउन उठवता येत नाही. परिस्थितीचा आढावा घेऊनच लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेतला जाईल.
पण लॉकडाऊन सरसकट उठवणं अडचणीचं ठरेल. निर्बंध शिथील करण्यासंबंधी मुख्यमंत्री ३१ मे च्या आधी निर्णय घेतील,” असं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.