ताज्या बातम्या

पोलीस दलात बदल्यांचे वारे, आवडते पोलीस ठाण्यासाठी ‘फिल्डिंग’

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Maharashtra News  :-नुकतेच जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचे सत्र सुरु झाले आहे. यातच आता जिल्हा पोलीस दलात पोलीस अंमलदारांच्या बदल्यांबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या गट संवर्गातील बदलीपात्र पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. दरम्यान बदली पात्र पोलीस अंमलदारांनी तीन पसंतीची ठिकाणे नमूद करून

तसा विनंती अर्ज प्रभारी अधिकारी यांचेकडे 25 मार्च, 2022 पर्यंत सादर करावा, असा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढला आहे.

आपल्या आवडीचे पोलीस ठाणे पदरात पाडून घेण्यासाठी पोलीस अंमलदारांच्या हालचालींना वेग आला आहे. 2022 मध्ये जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदलीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

यासाठी निकष लागू केले आहेत. हे आहेत निकष पोलीस अंमलदारांचा एका पोलीस ठाण्यातील कालावधी खंडित-अखंडित सेवा धरून पाच वर्षाचा राहील.

एका तालुक्यात एका पेक्षा जास्त पोलीस ठाणे असेल त्या तालुक्यामधील कमाल कालावधी सर्व संवर्गातील खंडित अथवा अखंडित सेवा धरून 12 वर्षे राहील.

स्वग्राम असलेल्या तालुक्यात बदली, नेमणूक देता येणार नाही. स्थानिक गुन्हे शाखा येथे पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी नेमणूक देता येणार नाही.

या निकषाच्या अधीन राहून बदल्या केल्या जाणार आहेत. वरील नमुद निकषानुसार ज्या पोलीस अंमलदारांचा विहीत कालावधी 31 मे, 2022 रोजी पूर्ण झाला आहे व ते बदली पात्र आहेत. त्यांनी वरील निकषाचे काळजीपूर्वक अवलोकन करण्याचे आदेश अधीक्षक पाटील यांनी दिले आहेत.

Ahmednagarlive24 Office