अहमदनगर ब्रेकिंग : महाविकास आघाडीत फूट !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- मनपा महापौरपद व उपमहापौर पद जवळपास निश्चित झाले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले आहेत.

महापौरपद शिवसेनेला देण्याचा निर्णय झाला असून उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे राहणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत काँग्रेसला सुरुवातीपासूनच दूर ठेवण्यात आले आहे. त्यातच काँग्रेसनेही आज महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज नेला आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. दरम्यान महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज शिवसेनेच्या नगरसेविका रोहिणी शेंडगे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

30 जून रोजी ऑनलाइन पद्धतीने निवडणूक होणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी उद्या (मंगळवार) दुपारी दीड वाजेपर्यंत मुदत आहे. त्यामुळे महापौर-उपमहापौर पदासाठी आणखी कोणकोण अर्ज नेणार व तो दाखल करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तसेच या निवडणुकीसाठी भाजपकडे पात्र उमेदवार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत निवडणूक लढविण्याचा निर्णय मुंबईत घेण्यात आला होता. जास्त जागा असल्याने महापौरपद शिवसेनेला तर उपमहापौरपद राष्ट्रवादीला असे वाटप करण्यात आले आहे.

मात्र, या सर्व प्रक्रियेत काँग्रेसला दूर ठेवण्यात आले. बैठका आणि अर्ज भरण्याच्या वेळीही काँग्रेसचे कोणी हजर नव्हते. गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपचा महापौर झाला होता. यावेळी भाजपकडे उमेदवार नाही.

त्यामुळे राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. शिवाय राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतरही मागणी केली जात होती.

दुसरीकडे महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसच्या नगरसेविका शीला दीप चव्हाण यांनी आज महापौर व उपमहापौर पदासाठी एक-एक अर्ज नेला आहे.

यामुळे उद्या (मंगळवार) त्या महापौर की उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24