अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता आता गावोगावी बैठका होऊन एकमात्र होऊन गावांमध्ये जनता कर्फ्यू लावण्याचा धडाका सुरु झाला आहे.
यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल अशी भावना बाळगली जात आहे. यातच नगर जिल्ह्यातील घुलेवाडी हे सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या गावात देखील वाढत्या कोरोनाच्या पार्शवभूमीवर जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे.
याकाळात वैद्यकीय कारणांसाठी किंवा अत्यावश्यक सेवेसाठीच ग्रामस्थांनी बाहेर पडावे, असे बंधन घालण्यात आले आहे. जनता कर्फ्यूच्या काळात केवळ औषध दुकाने व वैद्यकीय सेवा आणि ठरावीक वेळेत दूध संस्था यांनाच परवानगी देण्यात आली.
त्यामुळे गावात जनता कर्फ्यूचा परिणाम दिसून येतो आहे. या गावात अनेक शैक्षणिक संस्था, उद्योग, व्यवसाय, सहकारी साखर कारखाना याच बरोबर तालुका ग्रामीण रुग्णालय आहे.
या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उपाययोजना म्हणून १ मेपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
गावात ग्रामसुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली व दीडशे तरुण कार्यकर्ते सदस्य म्हणून निवडण्यात आले. या समितीच्या माध्यमातून गावात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. काही ठिकाणी मुख्य रस्त्यांवर चेक पोस्ट उभे करण्यात आले आहे.