अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- कोपरगाव शहरातील महत्त्वाचे रस्ते व विकासकामे होऊ नयेत म्हणून वारंवार अडथळे आणणार्या कोल्हे गटाच्या उपनगराध्यक्षाने संजीवनीचे दूत सोबत घेऊन शहर पोलीस ठाण्यामध्ये जात थेट मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे लेखी पत्र दिले.
यावरुन नगराध्यक्ष व आमदार पद ताब्यातून गेल्याचे दुःख अजूनही विसरू न शकलेल्या कोल्हे गटाने आज तर नीचपणाचा कळसच गाठला असल्याची घणाघाती टीका नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे. मुख्याधिकार्यांनी विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहून कलम 144 चा भंग केला म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी कोल्हे गटाने केली आहे. केवळ सत्ता नाही म्हणून साडेचार वर्षे किळसवाणे डावपेच केले.
मान्सूनपूर्व कामे करायला परवानगी असल्याने नगराध्यक्ष म्हणून मी व तालुक्याचे आमदार यांना व स्थानिक नगरसेवकांना कार्यक्रमाला बोलावले. शिवाय अधिकार्यांनाही बोलावले. निमंत्रण पत्रिका नाही, भाषणे नाहीत. त्याठिकाणी काही स्थानिक रहिवाशीही आले. जर कोल्हे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्याविरुद्ध तक्रार करावी.
विकासकामे करताना मुख्याधिकारी मला सहकार्य करतात म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी असा पोरकटपणा सुरू आहे असा आरोपही वहाडणे यांनी केला आहे. मागील महिन्यात संजीवनी कोविड सेंटरच्या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावून प्रचंड गर्दी जमवून स्वतःचा उदोउदो करून घेणार्या कोल्हे टोळीविरुद्ध कलम 144 चा भंग केला म्हणून गुन्हा का दाखल होत नाही?
असा सवालही उपस्थित केला आहे. जिल्हाधिकार्यांनी 28 विकासकामे मार्गी लावण्यासाठी हिरवा कंदील दिल्यानंतर मी कोल्हे गटाच्या नगरसेवकांना पत्र दिले कि, आता 28 कामांचा निर्णय झालेला आहे. आता तरी तुमच्या प्रभागातील विकासकामे करायची कि नाही, असे लेखी पत्र सर्वच नगरसेवकांना 5 एप्रिल, 2021 रोजी दिले.
परंतु, माझे पाय ओढण्याच्या नादात कोल्हे गटाच्या अपवाद वगळता कुणीही आमच्या प्रभागातील कामे सुरू करा असे पत्र आजपर्यंत दिलेले नाही. राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष नगरसेवकांनी ही कामे सुरू करा असे लेखी कळविले. पण कोल्हे गटाचे अनेक नगरसेवक मला येऊन भेटून सांगतात कि, कोल्हे यांच्या आदेशाशिवाय आम्ही असे पत्र देऊ शकत नाही.
मंजूर झालेली कामेही होऊ द्यायची नाहीत. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना असे वाटते कि नगराध्यक्षच कामे होऊ देत नाहीत. कोल्हे गटाचे व इतरही सर्व नगरसेवक, शहरातील काही पक्ष व संघटना कार्यक्षम मुख्याधिकारी सरोदे यांची बदली होऊ देऊ नका असे मला भेटून सांगतात.
मात्र, कोल्हे यांच्या आदेशावरून काहीजण त्याच अधिकार्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी करतात. सत्ता नाही म्हणून तडफडणार्या कोल्हे गटाने पोरकटपणा बंद करावा.
स्वतःच्याच प्रभागातील विकासकामे करायला विरोध करण्याचा मूर्खपणा केल्याचा विक्रम महाराष्ट्रात कोल्हे यांच्याच नावावर नोंदवला जाणार आहे, अशी कोपरखळीही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी मारली आहे.